मीरा-भाईंदरमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:22 AM2019-12-10T04:22:29+5:302019-12-10T06:00:14+5:30
याआधीही २७ सप्टेंबर रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.
ठाणे : सोनसाखळी जबरी चोरीसाठी उत्तर प्रदेशातून ठाणे ग्रामीणमधील मीरा रोड आणि भाईंदर भागात आलेल्या अजितसिंग सिंग, यशपाल सिंग, धरमपाल सिंग यांच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी जबरी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले असून चोरीतील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह चार लाख ५१ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीच्या जबरी चोºया तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पोलिसांना १८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिले होते. काशिमीरा येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पथकांची निर्मिती केली. अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे आणि विलास कुटे यांच्या पथकाने मीरा रोड आणि काशिमीरा भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यात मिळालेल्या दोन मोटारसायकलच्या क्रमांकांच्या आधारे संजय सिंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याच चौकशीमध्ये संजय सिंग याच्यासह चौघांना ताब्यात घेतले.
उत्तर प्रदेशातून आलेले असल्यामुळे दिवसा लॉजवर वास्तव्य करून रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांच्या सोनसाखळ्या किंवा मंगळसूत्रे मोटारसायकलवरून येऊन जबरीने चोरत असल्याची त्यांनी कबुली दिली. त्यानुसार, त्यांना २ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांना याआधीही २७ सप्टेंबर रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मीरा-भार्इंदर विभागातील तीन गुन्हे उघड झाले असून त्यातील २१ हजार ६०० रुपयांचे दागिने आणि मोटारसायकल असा ४१ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
दिल्लीतून आरोपींकडून सहा गुन्हे उघड
सहायक पोलीस निरीक्षक कुटे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने राजकुमार मालावत, आशू मालावत, सुनील राजपूत आणि सोनू ऊर्फ भरत जाठव (रा. सर्व नवी दिल्ली) यांना त्याच दरम्यान अटक केली. नवी दिल्ली येथून मीरा रोड परिसरात खास सोनसाखळी चोरीसाठी ही टोळी येत होती. त्यांच्याकडून मीरा-भार्इंदर परिसरातील सहा गुन्हे उघडकीस आले असून त्यातील १५० ग्रॅम वजनाचे चार लाख १० हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले.