धंदेवाईक जामीनदारांची टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:37 AM2018-08-07T06:37:57+5:302018-08-07T06:43:59+5:30

धंदेवाईक जामीनदार न्यायालयासमोर उभे करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या सहा आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटने अटक केली.

The gang of businessman jailed | धंदेवाईक जामीनदारांची टोळी गजाआड

धंदेवाईक जामीनदारांची टोळी गजाआड

googlenewsNext

ठाणे : धंदेवाईक जामीनदार न्यायालयासमोर उभे करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या सहा आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटने अटक केली. जवळपास १५० आरोपींना बोगस जामीन मिळवून देणा-या या टोळीकडून बनावट कागदपत्रांसह रबरी शिक्क्यांचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला.
धंदेवाईक जामीनदारांच्या टोळीची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटला ३० जुलै रोजी मिळाली होती. त्यानुसार, कल्याण न्यायालय परिसरातून तीन आरोपींना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले होते. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींच्या आणखी
तीन साथीदारांची माहिती मिळाली. त्यानुसार, एकूण सहा आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींकडून बनावट ४५ रबरी शिक्के, ५१ बोगस शिधापत्रिका, ग्रामपंचायतीचा कर भरल्याच्या ३१८ पावत्या, काही बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. या टोळीच्या सूत्रधाराने साथीदारांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाच्या बनावट शिधापत्रिका तयार केल्या. त्यानंतर, ग्रामसेवकाच्या सही, शिक्क्यानिशी ग्रामपंचायतीचा कर भरल्याच्या पावत्या तयार केल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे धंदेवाईक जामीनदारास न्यायालयासमोर उभे करून त्याने अनेक प्रकरणांमधील आरोपींना जामीन मिळवून दिला. टोळीच्या सूत्रधाराने बनावट शिधापत्रिका बनविण्यासाठी भिवंडी येथील एका झेरॉक्स सेंटरची मदत घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
ग्रामपंचायतीच्या करपावत्या त्याने उल्हासनगरातील एका प्रिंटिंग प्रेसमधून छापून घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली. आरोपींनी बनावट शिक्के सोलापूर येथून बनवून घेतले होते. जवळपास वर्षभरापासून आरोपींचा हा गोरखधंदा सुरू आहे. पोलीस निरीक्षक मनोहर पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
>बोगस जामीन मिळवलेल्या आरोपींचीही चौकशी
धंदेवाईक जामीनदारांच्या टोळीने आतापर्यंत १२५ ते १५० आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून दिल्याची पोलिसांची माहिती आहे. कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे न्यायालयात आरोपींनी हे गुन्हे केले आहेत.
त्यांनी आतापर्यंत ज्यांना-ज्यांना जामीन मिळवून दिला, त्या सर्व आरोपींचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींच्या चौकशीतून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
>आरोपींची नावे उघड करण्यास पोलिसांचा नकार
न्यायालयातून आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे लागायची. ती सर्व बनावट कागदपत्रे या टोळीने तयार केली. काही प्रकरणांमध्ये त्यांनी बनावट आधार कार्डदेखील तयार केले. या कामासाठी त्यांना कुणाची मदत मिळाली, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याने आरोपींची नावे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला.

 

Web Title: The gang of businessman jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक