ठाणे, नवी मुंबईतील व्यावसायिकांना जादा रकमेचे अमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:32 PM2019-10-02T22:32:39+5:302019-10-02T22:52:02+5:30

अल्प किंमतीमध्ये माल देण्याच्या नावाखाली तसेच देवस्थानातील सुटे पैसे २० टक्के कमिशन देण्याचे अमिष दाखवून सुमारे एक कोटींची फसवणूक करणाऱ-या टीव्ही मालिकांमधील भिमराज मल्लिकार्जून मालजी या अभिनेत्यासह चौघा जणांच्या टोळीला शीळ डायघर पोलिसांनी अटक नुकतीच अटक केली आहे.

Gang of cheater arrested for cheating businessman in Thane and Mavi Mumbai | ठाणे, नवी मुंबईतील व्यावसायिकांना जादा रकमेचे अमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

गुन्हेगारी मालिकांतील अभिनेत्यासह चौघांना अटक

Next
ठळक मुद्देगुन्हेगारी मालिकांतील अभिनेत्यासह चौघांना अटकबनावट नोटांसह १० मोबाइल हस्तगत बनावट सोन्याची बिस्टीटांचीही केली विक्री

ठाणे: व्यावसायिकांना तसेच सामान्य लोकांना जादा रकमेचा परतावा देण्याचे अमिष दाखवून सुमारे एक कोटींची फसवणूक करणा-या भिमराज मल्लिकार्जून मालजी उर्फ चेतन उर्फ सोनूसिंग (३१, रा. गोवंडी, मुंबई) याच्यासह चौघा जणांच्या टोळीला शीळ डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. त्यांच्याकडून बनावट नोटांसह दहा मोबाइल आणि २८ हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबईच्या कुर्ला येथील नौशाद शेख (४२) या चामडयाच्या व्यापा-याला परदेशातून आयात केलेले चामडे अल्प किंमतीत देतो, असे अमिष दाखूवन कमल आणि चेतन या दोघा भामटयांनी ठाण्यातील कल्याण फाटा येथील हॉटेल शालू येथे १३ जुलै २०१९ रोजी बोलविले. अल्प दरात चामडे देण्याच्या नावाखाली नौशाद यांच्याकडून त्यांनी दोन लाखांची रक्कम आगाऊ घेतली. ही रक्कम मिळाल्यानंतर दोघांपैकी एकजण तिथून पसार झाला तर दुस-याला बनावट पोलिसांनी घेऊन गेले. त्यामुळे नौशाद यांना पैसेही मिळाले नाही आणि आयात केलेले चामडेही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती.
पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक सागर शिंदे, विकास राठोड आणि संतोष तागड आदींच्या तपास पथकाने या आरोपींचा शोध सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस आरोपींच्या मागावर असतांना यातील आरोपी हे मोबाइल तंत्रज्ञानाने अवगत असल्याने पोलिसांना हुलकावणी देत होते. त्यामुळे ते प्रत्येकवेळी आपले मोबाईल आणि सिम कार्डही बदलत होते. त्यामुळे त्यांना पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. तरीही मोठया कौशल्याने सावज हेरणारा भिमराज याच्यासह प्रविण वर्मा उर्फ कमल उर्फ लल्लू (२९, रा. मुंब्रा, ठाणे), बनावट पोलीस मल्लेश श्रीमंत डिंगी उर्फ मल्लू (४७, रा. भिवंडी) आणि चवडप्पा कालोर (३८, रा. भिवंडी, सिमकार्ड पुरविणारा) या चौघांना अटक केली. यातील आणखीही काही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे बुरसे यांनी सांगितले.
आधी एखाद्या सावजाला आपल्या जाळयात ओढण्यासाठी त्यांना ते हेरत असत. नंतर संबंधित व्यक्ती किंवा व्यापा-याच्या गरजेनुसार ते त्यांना भूलथापा देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थान तसेच दादर येथील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचा हवाला देऊन या देवस्थानांकडे बरेच पैसे आणि दागिने पडून असल्याचे सांगून शंभर रु पयांच्या नोटांच्या बदल्यात दोन हजारांच्या किंवा पाचशेच्या नोटांची गरज असल्याचे सांगून देणारांना २० टक्के कमिशन देण्याचेही अमिष दाखवून लोकांना जाळयात ओढत असत. जो असे पैसे देण्याची तयारी दर्शवित असे, त्यांना शंभराच्या नोटांचे बंडल आणि सोन्याचे बिस्कीट दाखवित असत. या बंडलांमध्ये वरच्या बाजूला काही नोटा ख-या ठेवून खाली को-या कागदाची बंडले ठेवत असत. सोन्याची बनावट बिस्कीटे तयार करुन ती दाखवून ती स्वस्तामध्ये देण्याचे अमिष ते दाखवायचे. अशा व्यवहारांच्या वेळी पोलिसांची बनावट रेड पडल्याचे दाखवून तिथून ते पसार होत होते. त्यानंतर मोबाइल बंद करुन सिम कार्डही ते फेकून देत असत. त्यांनी अशा प्रकारे नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथे दोन, खारघर येथे दोन असे चार गुन्हे केले आहेत. याशिवाय, अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे फसवणूकीचे प्रकार करुन अनेकांची सुमारे एक कोटींची फसवणूक केल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. त्यांच्याकडून दहा मोबाईल, फसवणूकीतील रकमेपैकी २८ हजार रुपये आणि फसवणूकीसाठी वापरलेल्या बनावट नोटा आणि बनावट सोन्याची बिस्कीटे हस्तगत करण्यात आली आहेत.
....................
आसाम आणि उत्तरप्रदेशातील २५६ सिमकार्डचा वापर
आरोपींमध्ये भिमराज मालजी हा टीव्ही मालिकांमधून दाखविल्या जाणा-या गुन्हेगारीवरील आधारीत मालिकांमध्ये छोटया मोठया भूमीका साकारत होता. त्यामुळे पोलीस मोबाइलच्या आधारे गुन्हेगारांचा कसा माग काढतात, हे त्याला चांगले माहिती होते. त्यामुळेच त्यांनी एखाद्याची फसवणूक केल्यानंतर लगेच सिमकार्ड आणि मोबाइलही बदलत असत. महाराष्ट्रात याचा शोध लागू नये म्हणून आसाम आणि उत्तर प्रदेशातील सुमारे २५६ सिम कार्डचा त्यांनी वापर केल्याची बाब समोर आली आहे. सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे. त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

 

Web Title: Gang of cheater arrested for cheating businessman in Thane and Mavi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.