उत्तराखंडमधून येऊन वयोवृद्धांना लुटणाऱ्या टोळीला अटक
By धीरज परब | Updated: February 7, 2025 19:27 IST2025-02-07T19:27:01+5:302025-02-07T19:27:41+5:30
सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

उत्तराखंडमधून येऊन वयोवृद्धांना लुटणाऱ्या टोळीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - उतरराखंड राज्यातून येऊन ट्रेनने येऊन भाईंदर सह मुंबई परिसरात पादचारी वृद्धांना लुबाडणाऱ्या चौकडीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने गुजरातच्या गांधी नगर रेल्वे स्थानकातून रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने अटक केली आहे . त्यांनी केलेले ५ गुन्हे उघडकीस आले आहेत .
भाईंदर पूर्वेच्या काशीनगर येथे राहणाऱ्या दिनाक्षी पाटील ( वय ५० वर्षे ) या घरी जात असताना काशीनगर येथे त्यांना बोलण्यात गुंतवण दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील सोन्याची फुले असे दागिने लांबवणाऱ्या अनोळखी आरोपींवर २ फेब्रुवारी रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास मीरा भाईंदर - वसई विरार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे , सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय सरक, प्रशांत गांगुर्डे व नितीन केंद्रे सह श्रीमंत जेधे , मनोहर तावरे ,आसिफ मुल्ला, संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड , रवींद्र भालेराव , गोविंद केंद्रे , विकास राजपूत अन्य पोलीस यांच्या पथकाने चालवला होता .
सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. माहिती व तांत्रिक विश्लेषणात आरोपी हे गुन्हा केल्यानंतर रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यांनी गुजराच्या गांधी नगर रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलीस आयुक्त संजय चौधरी, वरिष्ठ निरीक्षक सुनील सिंग, हवा. मोगल आदींच्या मदतीने ४ आरोपीना ताब्यात घेतले .
आयुब कलूवा हसन ( वय २६ वर्षे ) , फारूकअली लोहरी शाह ( ३४ वर्षे ) , नौशाद अलीमुद्दीन हसन (वय २८ ) व जलालुद्दीन लोहरी शाह ( वय ४५ वर्षे ) अशी अटक आरोपींची नावे असून हे सर्व उत्तराखंडच्या उधमसिंह नगर भागातील राहणारे आहेत. आरोपींकडून १७ तोळे वजनाचे १४ लाख २३ हजार किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्हा करताना वापरलेल्या १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, २७ हजार किमतीचे चार मोबाईल, रोख असा एकूण १५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .
सदर आरोपींनी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यासह मुलुंड, टिळक नगर , कांदिवली व घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीत देखील असे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे .