एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी ठाण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:45 PM2019-10-05T21:45:38+5:302019-10-05T22:02:29+5:30

खून, खूनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल चोरटयांनी ठाण्यातील एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पर्वतसिंग चुडावत या अट्टल गुन्हेगारासह तिघा जणांच्या टोळक्याला शुक्रवारी (४ आॅक्टोंबर) अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

Gang of interstate robber arrested in Thane | एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी ठाण्यात जेरबंद

अवघ्या ३६ तासांमध्ये अट्टल चोरटयांना अटक

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई अवघ्या ३६ तासांमध्ये अट्टल चोरटयांना अटकराजस्थानासह ठाणे मुंबईत अनेक गुन्हे दाखल

ठाणे : घोडबंदर रोडवरील बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्वतसिंग चुंडावत (४३) याच्यासह तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने अवघ्या ३६ तासांमध्ये जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी दिली. या सर्व आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील लॉकीम कंपनीसमोरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना १ आॅक्टोबर २०१९ रोजी पहाटे ४.१२ ते ४.३९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. एटीएम केंद्राचे शटर आतून बंद करून गॅसकटरच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून कॅश डिपॉझिट मशीन कापून मोठे नुकसान केले. सुदैवाने त्यांना यातील रोकड लुटता आली नाही. याच परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये दोघेजण चोरटे आढळून आले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कापूरबावडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही यातील आरोपींचा शोध घेत होते. यातील एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणारी टोळी बाळकुम परिसरात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे यांना मिळाली. ही माहिती तसेच सीसीटीव्हीतील चित्रण आणि सुमारे १० ते २० हजार मोबाइल विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपींचा माग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक प्रदीप भोईर, पोलीस कॉन्स्टेबल शेजवळ आणि अदिती तांबे आदींच्या पथकाने काढला. ठाण्यातील बाळकुम, साकेत रोड परिसरात सापळा लावून पर्वतसिंग चुंडावत (रा. मनोरमानगर, मूळ रा. राजसमंद, राजस्थान), राजसिंग ठाकूर (३५, रा. इंदिरानगर, मूळ रा. उत्तरांचल) आणि अमोल संपत यादव ऊर्फ अमोल सोमनाथ शुक्ला (३०, रा. इंदिरानगर, ठाणे, मूळ रा. सातारा) या तिघांनाही या पथकाने अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी एटीएम फोडून त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.हे तिघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर राजस्थान, मुंबई तसेच ठाण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कुख्यात गँगस्टरचा खून
आरोपींपैकी राजसिंग ठाकूर हा दहिसर येथील एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातून एक वर्षापूर्वीच जामिनावर सुटलेला आहे. त्याने संदीप शेट्टी या गँगस्टरचाही २०१५ मध्ये अंबरनाथमध्ये खून केला होता. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, मुंबई, एमएचबी, मीरा रोड, ठाणे ग्रामीण, भांडुप, दहिसर, राजस्थानमधील अमेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध सात ते आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
* लाखोंच्या विम्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनाव
आरोपींमधील पर्वतसिंग याने ५० ते ६० लाखांच्या विम्यातील पैसे मिळविण्यासाठी स्वत:च्याच खुनाचा बनाव केला होता. त्याने त्याच्यासारख्याच शरीरयष्टीच्या एका अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याच्याजवळ स्वत:चे ओळखपत्र ठेवले. त्याच्या कुटुंबीयांनी राजस्थानमध्ये त्याचा अंत्यविधीही केला. त्यानंतर, ठाण्यात दीड वर्षापूर्वी एका गुन्ह्यात पकडल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याला समोर दाखवल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला होता. या प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. त्याआधी २००९ मध्येही पैशांसाठी आपल्याच भावाचा त्याने खून केला होता. त्याही गुन्ह्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती. तर, तिसरा आरोपी अमोल हा रिक्षाचालक असून त्याने सिलिंडर आणि गॅसकटरच्या वाहतुकीसाठी रिक्षाचा वापर केला. तसेच गुन्ह्याच्या वेळी तो टेहळणीचे काम करीत होता. त्याची रिक्षा आणि गॅसकटरही पोलिसांनी जप्त केले आहे.

 

Web Title: Gang of interstate robber arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.