आंतरराज्य वाहन चोरी करणारी नऊ जणांची टोळी जेरबंद: तीन कोटी ४० लाखांची ८० वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 07:11 PM2019-02-07T19:11:15+5:302019-02-07T19:24:25+5:30
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीतील उद्धव साठे यांच्या वाहनाची चोरी राबोडी पोलिसांनी ११ डिसेंबर २०१८ रोजी उघडकीस आणली. त्यातूनच भोर येथून संदीप लागूसह दोघांना अटक झाली. त्यांच्या अटकेतूनच मोठया आंतराज्य रॅकेटचा भंडाभोड करण्यात ठाणे पोलिसांना यश आले.
ठाणे: महाराष्टÑ तसेच गुजरातमधील वाहनांची चोरी करुन त्यांच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकामध्ये बदल केल्यानंतर ती कर्नाटक आणि राजस्थानमध्ये विक्री करणा-या संदीप लागू (रा. जोगेश्वरी, मुंबई) या सूत्रधारासह नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १८० चोरीच्या वाहनांपैकी १०५ गुन्हे उघड झाले आहेत. त्यातील तीन कोटी ४० लाख किंमतीची ८० वाहने जप्त केल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीतील रहिवाशी उद्धव साठे यांची पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप जीप १० डिसेंबर २०१८ रोजी चोरीस गेली. यासंदर्भात त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या वाहनाला साठे यांनी लावलेल्या जीपीएस यंत्रणेच्या तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश जाधव यांनी पुणे जिल्ह्यातील भोर येथील एका गोदामातून ही गाडी ताब्यात घेतली. ज्यांची ही गोदामे आहेत त्या शेतकºयांच्या चौकशीतून संदीप मुरलीधर लागू आणि विनीत माधीवाल (रा. दोघेही मुंबई, महाराष्टÑ) या दोघांची नावे समोर आली. सुरुवातीला ११ डिसेंबर २०१८ रोजी संदीपला जाधव यांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर एक मोठे आंतरराज्य रॅकेटच या वाहन चोरीमध्ये कार्यरत असल्याची माहिती उघड झाली. पुढे १६ डिसेंबर रोजी अल्ताब गोकाक (रा. बेळगाव, कर्नाटक) याला १६ तर विनीतला १७ डिसेंबर रोजी मुंबईतून अटक करण्यात आली. या तिघांच्याही चौकशीतून इतरांचीही नावे उघड झाली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश अलिकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक गणेश केकाण, महेश जाधव, इर्शाद सय्यद तसेच सहायक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, निलेश मोरे, उपनिरीक्षक कृष्णा बाबर, संतोष तागड आदींची पाच पथके तयार करण्यात आली.
१८० चोरीच्या गुन्हयांची माहिती उघड
टोळीचे नागालँड, राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेश राज्यापर्यंत धागेदोरे असल्याची माहितीही या तिघांनी दिली. त्यानुसार ठाणे पोलिसांनी सादिक मेहमूद खान (बेळगाव, कर्नाटक), मांगीलाल जाखड , रामप्रसाद ईनानिया (रा. नागौर, राजस्थान), जावेद उर्फ बबलू खान, अल्ताब कुरेशी , मोहमद खान (रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) या संपूर्ण वाहन चोरी करणा-या टोळीलाच एका मागोमाग अटक करण्यात आली. त्यांना आधी ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १८० चोरीच्या गुन्हयांची माहिती उघड झाली असून त्यातील १०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी ६९ महिंद्रा पिकअप, आठ महिंद्रा बोलेरो, एक होंडा सिटी, एक वेरणा, अशी तीन कोटी ४० लाखांची ८० वाहने राजस्थान, कर्नाटक, पुणे आणि मुंबई परिसरातून जप्त केल्याचेही पांडेय यांनी सांगितले.
वाहन चोरीच्या टोळीचा संदीप लागू होता सूत्रधार
संदीप लागू हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून विनीत माधीवाल याच्या आई बरोबर त्याचे घनिष्ट संबंध आहेत. तिच्यामार्फतच लागू आणि इतर आरोपींची ओळख झाली. याच टोळीच्या मदतीने लागूने महाराष्टÑातील ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, रायगड , पुणे, अहमदनगर आणि नाशिक तर गुजरातमधूनही वाहनांची चोरी केली. चोरी केलेली ही वाहने त्यांनी पुण्याच्या भोर येथील एका गोदामामध्ये ठेवली होती. या वाहनांचे चेसीस आणि इंजिन क्रमांकामध्ये बदल करुन नागालँड येथून वाहनांचे आरसी (नोंदणी प्रमाणपत्र) बुक बनवून ते वाहन कर्नाटक आणि राजस्थान येथील दलालांमार्फत विक्री केले जात होते, अशीही माहिती तपासात समोर आल्याचे पांडेय यांनी सांगितले.
वाहन मालकांना आवाहन
सार्वजनिक रस्त्यावर अथवा निर्जन स्थळी आपले वाहन उभे करु नये. वाहनाला जीपीएस यंत्रणा तसेच तत्सम यंत्रणा बसविण्यात यावी. शक्यतो सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये आपले वाहन पार्क करावे. वाहनामध्ये स्टेअरिंग लॉक आणि अलार्म सिस्टीम बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.