अल्पवयीन चोरांची टोळी जेरबंद, टोळीचा म्होरक्या अवघा १९ वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:04 AM2018-12-22T03:04:48+5:302018-12-22T03:06:16+5:30
उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकल चोरीप्रकरणी अल्पवयीन आरोपींची टोळी जेरबंद केली आहे. या टोळीतील पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यांच्याकडून चोरीच्या २५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकल चोरीप्रकरणी अल्पवयीन आरोपींची टोळी जेरबंद केली आहे. या टोळीतील पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यांच्याकडून चोरीच्या २५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर पोलीस परिमंडळांतर्गत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली होती. दुचाकीचोरीच्या दररोज दोन ते तीन गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये होत आहे. वाढत्या गुन्ह्यांनी वाहनधारकांसोबतच पोलीसही हैराण झाले आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, सखोल तपास करण्याचे आदेश शहर गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला सापळा रचून ताब्यात घेतले. या टोळीचा म्होरक्या धनंजय कुमावत हा १९ वर्षांचा असून त्याचे चार साथीदार अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून १५ स्कूटर आणि १० मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.
धनंजय कुमावत याच्यावर घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली. धनंजय कुमावत याला न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून चार अल्पवयीन साथीदारांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीच्या चौकशीतून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी व्यक्त केला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटारसायकलचोरांच्या आणखी काही टोळ्या शहरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळ्यांवर गुन्हे अन्वेषण विभाग लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मौजमजेसाठी चोरी
आरोपींनी सुरुवातीला मौजमजेसाठी मोटारसायकली चोरण्याचा उद्योग सुरू केला. चोरीच्या गाड्यांची ते विक्री करत होते. त्यातून मिळालेल्या पैशांतून मौजमजा करायचे. गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकलचोरीच्या दुसऱ्या टोळीला यापूर्वीही गजाआड केले होते. गेल्या आठवड्यातही विठ्ठलवाडी पोलिसांनी गाड्या चोरणाºया एका टोळीला अटक करून त्यांच्याकडून ११ मोटारसायकली जप्त केल्या.