भिवंडीत अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक, नारपोली पोलिसांची कारवाई
By नितीन पंडित | Published: December 28, 2023 07:41 PM2023-12-28T19:41:32+5:302023-12-28T19:42:28+5:30
भिवंडी : मानकोली परिसरात असलेल्या प्रभात केबल प्रा.लि.च्या गोदामावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या १३ जणांच्या टोळीतील आरोपींनी तेथील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा ...
भिवंडी: मानकोली परिसरात असलेल्या प्रभात केबल प्रा.लि.च्या गोदामावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या १३ जणांच्या टोळीतील आरोपींनी तेथील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन मोबाईल असा मुद्देमाल चोरी केला होता.नारपोली पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत एकूण नऊ दरोडेखोरांना अटक केली आहे.यातील तीन आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.हे सर्व आरोपी गोवंडी मुंबई परिसरातील असून मुंबई,ठाणे,रायगड या परिसरात त्यांनी दरोड्याचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
१३ डिसेंबर रोजी तेरा जणांच्या टोळीने मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी गोदामाच्या मुख्य गेटला शिडी लावून गोदाम परिसरात गेले असता त्याठिकाणी त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला असता त्यांनी तेथील कामगारांना हत्यारांचा धाक दाखवून सोन्याची चैन, रोख रक्कम चोरी केली होती.या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे,पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार, डी डी पाटील,व पोलिस पथकातील पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच अवघ्या सहा तासात मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इशान अब्दुल रहेमान शेख,शहबाज मोहम्मद सलीम शेख अशा दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या जवळ कसून चौकशी करीत अहमद हुसेन सत्तार सावत उर्फ सलीम,वजीर मोहम्मद हुसेन सावत उर्फ कान्या,रेहान कब्बन सैय्यद, गुलामअली लालमोहम्मद खान,हसन मेहंदी शेख,सलीम फत्तेमोहम्मद अन्सारी उर्फ सलीम हाकला,प्रमोदकुमार बन्सबहादुर सिंग यांना मुंबई आयुक्तालयातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेवून एकूण नऊ जणांना अटक केली आहे.अटक केलेले सर्व आरोपी हे सराईत दरोडेखोर असून त्यांच्या विरोधात मुंबई,वसई,रायगड,पुणे या विविध ठिकाणी १४ दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे तर तीन जणांविरोधात पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार हे करीत आहेत.