भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकणारी टाेळी ठाण्यात जेरबंद, 12 गुन्हे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:36 AM2022-09-20T11:36:34+5:302022-09-20T11:37:27+5:30

कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलीकडेच मोटारवाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता

Gang selling vehicles on lease arrested in Thane, 12 crimes revealed | भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकणारी टाेळी ठाण्यात जेरबंद, 12 गुन्हे उघड

भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकणारी टाेळी ठाण्यात जेरबंद, 12 गुन्हे उघड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाहने चोरीसह भाडेतत्त्वावरील वाहनांची विक्री करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या परवेझ इक्बाल सैयद (३४, रा. मुंबई , मूळ रा. लोहियानगर, हुबळी, कर्नाटक) या अट्टल चाेरट्याला कर्नाटक येथून, तर त्याचा साथीदार फयाझ अहमद मोहिब्बुल हक (५४, रा. कुर्ला, मुंबई) याला मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून  सहा वाहने आणि मोडीत काढलेल्या चार वाहनांचे इंजिन असा २१ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलीकडेच मोटारवाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांचे एक पथक निर्माण केले होते. 
या पथकाने सलग पाच दिवस अथक परिश्रम घेऊन ठाणे, कल्याण, सातारा, कोल्हापूर, हुबळी (कर्नाटक) येथे जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज, मोटारीच्या गॅरेजमधील मेकॅनिक, स्थानिक नागरिक आणि तांत्रिक तपास करून हुबळी येथून परवेझ सैयद याला १२ सप्टेंबरला नवी मुंबईतून चोरी केलेल्या एका कारसह ताब्यात घेतले. त्याने कारच्या चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला १३ सप्टेंबरला अटक केली.  न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील १२ गुन्हे उघड
चोरीच्या तपासात परवेझ याच्याकडून मुंबईतील सहार, मुलुंडमध्ये चार तसेच ठाण्यातील कापूरबावडी, कळवा, मुंब्रा येथे सात आणि नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमधील एक  असे १२ गुन्हे उघड झाले आहेत. तपासात सहा कार आणि चार भंगारातील वाहनांचे इंजिनसह सुटे भाग असा २१ लाख दहा हजारांचा  मुद्देमाल जप्त केला.

वाहने भाडेतत्त्वावर घेऊन फसवणूक
अटक केल्यानंतर परवेझ याने पोलिसांना कबुली दिली की, त्याने अशाच प्रकारे इतरही कारची चोरी केली. त्याचबरोबर नागरिकांना अधिक भाड्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वाहने भाडेतत्त्वावर घेऊन त्या इतर लोकांना खोटी कारणे सांगून त्यांची विक्री केल्याचेही उघड झाले. यातील काही वाहने त्याने  फयाझ अहमद मोहिब्बुल हक याला भंगारामध्ये विक्री केली. फयाझ याचाही या गुन्ह्यात सहभाग उघड झाल्याने त्यालाही या  गुन्ह्यात अटक केली.

Web Title: Gang selling vehicles on lease arrested in Thane, 12 crimes revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.