प्रवाशांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:01 AM2020-02-25T00:01:09+5:302020-02-25T00:01:23+5:30

आरोपींना चार दिवसांची कोठडी : अंधाराचा फायदा घेत दोन साथीदारांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी

A gang of six men robbing passengers | प्रवाशांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

प्रवाशांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

Next

कल्याण : रेल्वे स्थानक तसेच बस आगारातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या सहा जणांच्या टोळीला महात्मा फुले चौक पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. त्यांचे अन्य दोन साथीदार पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाले. आरोपींना कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केट परिसरातून चालत जाणाºया प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडले जात असल्याच्या तक्रारी महात्मा फुले चौक पोलिसांकडे वाढल्या होत्या. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आणि त्यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला. सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास याठिकाणी समाधान मोरे (४५, रा. कल्याण), निलेश शेलार (१९, रा. उल्हासनगर), काल्या सावंत (२५, रा. कल्याण), गोकूळ सोनवणे (२६, रा. जळगाव), सम्राट शिंदे (२५, रा. कल्याण) आणि नदीम पठाण (३०, रा. कल्याण) हे संशयास्पदरित्या फिरताना पथकाला आढळले. पोलिसांच्या पथकाने या सहा जणांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. सहा जणांच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना चाकू, मिरची पूड आढळून आली. पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रवाशांना लुटण्याच्या उद्देशाने आपण आल्याची कबुली त्यांनी चौकशीदरम्यान दिली. या टोळीविरोधात पंधराहून अधिक गुन्हे दाखल असून त्यांनी आतापर्यंत किती जणांना लुबाडले आहे याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रिक्षाचालकाला लुटणारा अटकेत
कल्याण : रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची वाट पाहत उभा असलेल्या एका रिक्षाचालकावर चाकू हल्ला करत त्याच्याकडील रोकड लांबवणारा सोनू गुज्जर (२३, रा. पत्री पूल परिसर) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली.पश्चिमेतील एसटी आगाराबाहेर रिक्षाचालक निसार खान (३२, रा. कचोरे) रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास प्रवाशांची वाट पाहत उभा होता. यावेळी, तेथे आलेल्या सोनूने चाकूचा धाक दाखवत ‘जेब मै कितना पैसा है, निकाल बाहर,’ असे निसारला धमकावले. पैसे देण्यास नकार देणाºया निसारवर चाकू हल्ला करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड सोनूने जबरदस्ती काढून घेतली. यावेळी, निसारने केलेल्या आरडाओरड यामुळे रिक्षा स्टॅण्डवरील अन्य रिक्षाचालकांनी सोनूला पकडले. याचदरम्यान, रात्रीची गस्त घालणाºया पोलिसांनी सोनूला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. तेव्हा, सोनूच्या खिशात निसारचे पैसे पोलिसांना आढळले. निसारच्या तक्रारीवरून सोनूला अटक केल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.

ठाण्यात रिक्षातील प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पलायन
एकीकडे जबरी चोºया रोखण्यासाठी पोलिसांनी गस्तीची व्यूहरचना केलेली असतानाच जबरी चोऱ्यांचे आव्हान कायम आहे. लोकमान्यनगर येथील रहिवासी रामसेवक कोरी (४२) हे रिक्षाने जात असताना त्यांच्या हातातील मोबाइल मोटारसायकलने आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना वसंतविहार भागात रविवारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोरी हे २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास जय गुरुदेव महाराज यांच्या दर्शनासाठी भार्इंदर येथे रिक्षाने जात होते. ते निळकंठ ग्रीन सोसायटीच्या पुढे असलेल्या युनिबेक्स कंपनीच्या समोर आले, त्यावेळी त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वारांपैकी मागे बसलेल्याने त्यांना आधी मुंब्रा येथे जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. नंतर त्यांच्या हाताला जोरदार झटका देऊन त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या धुमश्चक्रीत ते रिक्षातून पडल्यानंतर त्यांनी कोरी यांना हाताच्या चापटीने मारहाण करून त्यांचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी त्यांच्यासह अन्य एका विनाक्रमांकाच्या स्कूटरवरून आलेल्या दोघांसह चौघांनी तिथून पलायन केले. याप्रकरणी कोरी यांनी २३ फेब्रुवारी रोजी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे.

Web Title: A gang of six men robbing passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक