मृगाजीनसह शिंगांची तस्करी करणारी टोळी मुंब्य्रात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:47 PM2018-11-30T22:47:45+5:302018-11-30T22:58:02+5:30
अमरावतीच्या जंगलामध्ये शिकार केलेल्या हरणाच्या कातडीचा आणि शिंगाची तस्करी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सांबराचे एक, हरणाची दहा शिंगे आणि हरणाचे कातडे असा ४२ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी शुक्रवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वन्य प्राण्यांची कातडी आणि शिंगांची तस्करी करणा-या मोहम्मद तौसिफ सौदागर (२७) , शेख तौसिफ नासीर (२२ ) आणि रिजवान अहमद (३३) या अमरावतीच्या टोळक्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सांबराचे एक, हरणाची दहा शिंगे आणि हरणाचे कातडे आणि एक कार असा ४७ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी शुक्रवारी दिली.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष गायकवाड यांचे पथक २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४० वा. च्या सुमारास गस्त घालीत असतांना दोघेजण एका कारमधून वन्य प्राण्यांचे कातडे आणि शिंगे विक्रीसाठी कौसा, मुंब्रा भागात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे शीळ फाटयाकडून मुंब्रा रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्यावर सापळा रचून या पथकाने एका संशयित कारला पकडले. बॅरिकेटस लावून या कारला अडवून त्यातील या तिघांना ताब्यात घेतले. कारच्या डिक्कीतील काळया रंगाच्या सॅकमधील सफेद रंगाच्या गोणीतून सांबर आणि हरिण यांची ११ शिंगे तसेच हरणाचे ओलसर ताजे कातडे असा ४२ लाखांचा मुद्देमाल तसेच त्यांची पाच लाखांची कार असा ४७ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
.......................
अमरावतीच्या जंगलातच हरणाची शिकार?
या हरणाची अमरावतीच्या जंगलातच शिकार करुन ते मुंब्रा भागात तस्करीसाठी आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र, आरोपींची पोलीस कोठडी न मिळाल्याने यातील आरोपींची फारशी चौकशी करता न आल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींची ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वन्य प्राण्यांची शिकार कोणी आणि कुठे केली? शिंगे आणि कातडे कोणाला विकली जाणार होती, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.