ऑनलाइन ठगांना सिमकार्ड पुरवणारी टोळी गजाआड; दोघांना छत्तीसगडमधून केली अटक

By जितेंद्र कालेकर | Published: July 17, 2024 08:44 PM2024-07-17T20:44:42+5:302024-07-17T20:45:23+5:30

ठाणे गुन्हे शाखेच्या कारवाईत चीन, दुबईतील सायबर भामट्यांसोबत कनेक्शन उघड

gang that supplies SIM cards to online fraudsters arrested from Chhattisgarh | ऑनलाइन ठगांना सिमकार्ड पुरवणारी टोळी गजाआड; दोघांना छत्तीसगडमधून केली अटक

ऑनलाइन ठगांना सिमकार्ड पुरवणारी टोळी गजाआड; दोघांना छत्तीसगडमधून केली अटक

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीला याकरिता सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. यामध्ये अफताब ढेबर (२२, रा. छत्तीसगढ) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये चीन आणि दुबई कनेक्शनही उघड झाले असून, ७७९ मोबाइल सिमकार्डसह २३ मोबाइल हस्तगत केले.

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करून त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जाते. अशा गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यामधील रक्कम ऑनलाइन वळती करून फसवणूक केली जाते.

ठाण्यातील सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप सरफरे हे अशा १६ गुन्ह्यांचा एकत्रित तपास करीत असताना आरोपींनी फसवणुकीसाठी पीडितांशी व्हॉट्सॲप चॅटींगद्वारे संपर्क केलेल्या मोबाइल क्रमांकाच्या सीडीआर आणि व्हॉट्सॲप मेसेजिंगची माहिती मिळवली. त्यामध्ये ३० मोबाइलमधून वेगवेगळ्या राज्यातील २६०० मोबाइल सिमकार्डचे व्हॉट्सॲप छत्तीसगड, त्रिपुरा आणि इतर ठिकाणांहून कार्यरत (ॲक्टिव्ह) असल्याची, तसेच हा व्हॉट्सॲप आयपी हाँगकाँगमधील असल्याचीही माहिती मिळाली.

ठाण्यातील एका तक्रारदाराची अलीकडेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने २९ लाख ३० हजारांची फसवणूक केली होती. याच तपासात तक्रारदाराशी छत्तीसगडमधून व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधल्याची माहिती उघड झाली. आरोपींची माहिती नसताना मोबाइलच्या आयएमईआय लोकेशनच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण, सरफरे आणि उपनिरीक्षक सुभाष साळवी आणि अमलदार प्रवीण इंगळे आदींच्या पथकाने छत्तीसगडमध्ये छापा टाकून अफताब ढेबर आणि मनीषकुमार देशमुख (२७, रा. आर्यनगर, छत्तीसगड) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून प्रिॲक्टिवेटेड ७७९ मोबाइल सिमकार्ड, एक लॅपटॉप, दोन वायफाय राऊटर, २३ मोबाइल हॅन्डसेट, ५० क्रेडिट, डेबिट कार्डस, २० चेकबुक आणि काही रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला. या दोन्ही आरोपींना ५ जुलै २०२४ रोजी अटक केली. चाैकशीमध्ये त्यांनी भारतात सिमकार्ड खरेदी करून ती दुबईमध्ये आर्थिक फसवणुकीसाठी टोळीला विक्री करणारा भाईजान ऊर्फ हाफीज लईक अहमद (४८, रा. दिल्ली) यालाही अटक केली.

अशी केली जायची फसवणूक

सिम कार्ड खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल करून एकापेक्षा जास्तवेळा बायोमेट्रिक मशीनद्वारे ठसे घेऊन जास्त सिम कार्ड घेतली जायची. अशी सिम कार्ड ऑनलाइन फसवणुकीकरिता वापरली जात असल्याची माहिती अफताब आणि मनीषकुमार यांनी दिली. हे आराेपी मोबाइल सिम कार्ड पुरवठाधारकांशी आणि विक्रेत्यांशी संधान साधून गैरमार्गाने मोबाइल सिम कार्ड मिळवत होते. याच सिम कार्डद्वारे व्हॉट्सॲप मेसेज अथवा कॉल करून लोकांची बँक खाती रिकामी केली जात होती.

आरोपींनी रायपूर, विलासपूर आणि दिल्लीतील साथीदारांच्या संपर्कातून कंबोडिया, दुबई आणि चीन तसेच इतर देशांमधील सायबर भामट्यांना फसवणुकीसाठी सिम कार्ड पुरवल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली. अशाच गुन्ह्यांकरिता यापूर्वी ३००० सिम कार्डचा वापर केल्याचीही कबुली आरोपींनी दिली. पाच ते सहा बँक खात्यांमधून पैसे काढून घेण्याच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले. राजस्थान, हरयाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि केरळ, आदी राज्यांमधील पोलिस ठाण्यांमध्ये १४ तक्रारी दाखल असल्याचे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील रेकॉर्डवरून स्पष्ट झाले.

Web Title: gang that supplies SIM cards to online fraudsters arrested from Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.