राज्यभरातील कारच्या काचा फोडून टेप चोरणारी टोळी ठाण्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 08:27 PM2019-10-15T20:27:43+5:302019-10-15T20:47:52+5:30
रस्त्यावर किंवा पार्र्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून कारमधील टेपची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. मुंबई ठाण्यासह राज्यभरातील ४३ ठिकाणी अशा चो-या केल्याची कबूली या टोळीने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमधील कारच्या काचा फोडून कारटेप चोरणा-या टोळीतील जगन्नाथ सरोज (४६ ) आणि दिनेश कश्यप (३३) या दोघांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी १५ आॅक्टोंंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट ५ च्या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचे ४३ गुन्हयांची कबूली दिली असून त्यांच्याकडून तीन लाख ५० हजार ७०० रुपयांचे १६ नामांकित कंपन्यांचे कारटेप जप्त करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात पार्र्किंगमधील वाहनांच्या काचा फोडून टेप चोरण्याचे प्रकार सर्रास वाढले होते. त्याअनुषंगाने हे गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलिसांना दिले होते. अशा प्रकारे वाहनांमधील कारटेप चोरणारी टोळी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि रत्नागिरी आदी जिल्हयामध्ये कार्यरत असून ती नालासोपारा भागात फिरत असून त्यांच्यातील दोघेजण ठाण्यातील घोडबंदर रोड भागात टेहळणीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रणवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, जमादार बाबू चव्हाण, पोलीस हवालदार विकास लोहार, देविदास जाधव, मनोज पवार आणि पोलीस नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने सापळा लावून सरोज आणि कश्यक या दोघांनाही ११ आॅक्टोंबर रोजी अटक केली. सखोल चौकशीत त्यांनी ठाणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, पुणे शहर आणि रत्नागिरी अशा वेगवेगळया ठिकाणी ४५ गुन्हयांमध्ये त्यांना यापूर्वी अटक झाली आहे. त्यांनी चितळसर, कासारवडवली, वर्तकनगर, वागळे इस्टेट, ठाणेनगर आणि नौपाडा अशा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १४ गुन्हयांची कबूली दिली. याव्यतिरिक्त ठाणे ग्रामीण, मुंबई शहर परिसरात २९ कारटेप चोरीचे गुन्हे केल्याचीही कबूली दिली. त्यांच्याकडून नामांकित कंपन्यांचे १६ कारटेप हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४३ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांनी चोरीसाठी वापरलेली कार तसेच स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी टी पाना, लो्रखंडी पक्कड आणि एक्सा ब्लेड असा सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.