उल्हासनगरात व्यापाऱ्याला लुटणारी चौकडी गोव्यातून जेरबंद, २४ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी
By सदानंद नाईक | Published: April 20, 2023 06:36 PM2023-04-20T18:36:45+5:302023-04-20T18:36:54+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-२ मधूबन चौकातील अंबिका पान शॉप येथे चौकडीने १५ एप्रिल रोजी शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता ...
उल्हासनगर : कॅम्प नं-२ मधूबन चौकातील अंबिका पान शॉप येथे चौकडीने १५ एप्रिल रोजी शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून ६ लाख ८९ हजाराची रोकड त्यांच्याकडून लंपास केली. उल्हासनगर पोलिसांनी दोन दिवसात चौकडीला गोव्यातून अटक केली असून चौकडी पैकी एक जण अल्पवयीन मुलगा आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विनय भारत पाहुजा यांचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. १५ एप्रिल रोजी पाहुजा व्यवसायातील ६ लाख ८९ हजाराची रोकड रक्कम घेऊन सायंकाळी साडे पाच वाजता घरी निघाले. अंबिका पान सेंटर येथे चौघडीने त्यांना चाकूचा धाक दाखवून अडविले. त्यांना हिरा मॅरेज हॉल येथील एका गल्लीत नेऊन शिवीगाळ व मारहाण करीत बजाज चेतन इलेक्ट्रिकल मोटरसायकलच्या डिक्कीतून ६ लाख ८९ हजार रुपये चोरून नेले. याप्रकारने घाबरलेल्या विनय याने उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.
उल्हासनगर पोलिसांनी चौघाडी विरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास सुरू केला. तपासात आरोपीचे नाव उघड झाल्यावर त्यांच्या मार्गावर पोलीस पथक पाठवून १७ एप्रिल रोजी गोव्यातून चौकडीला अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख १ हजार रुपयांची रोकड व मोटरसायकल हस्तगत केली. चौकडी पैकी एक जण अल्पवयीन असून त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात केली. त्यानेच व्यापारी पाहुजा यांच्यावर पाळत ठेवून इतभूत माहिती साथीदारांना दिली होती. तर रोहित सिंग लबाना, गौतम पहलानी व करण यांना न्यायालयाने २४ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून अल्पवयीन मुलगा व रोहितसिंग लबाना यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.