अंबरनाथच्या शिवमंदिर गाभाऱ्यात अवतरली गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:29+5:302021-07-20T04:27:29+5:30
अंबरनाथ : गेल्या ४९ तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला पूर आला असून तिच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभार्यातदेखील ...
अंबरनाथ : गेल्या ४९ तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला पूर आला असून तिच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभार्यातदेखील तीन फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्याखाली आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकिनारी असलेल्या नागरी वस्तींना सतर्कतेचा इशारा नगरपालिकेने दिला आहे. याच नदीच्या काठावर असलेल्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरालादेखील पुराचा तडाखा बसला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात तीन फूट पाणी भरल्याने मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली आले आहे. मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी, मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विधिवत पूजा केली जाते. शिवलिंग पाण्याखाली आलेले असतानादेखील मंदिरात नियमित पूजा अजूनही सुरू असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
मंदिराकडे जाणारा रस्ता बंद
मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील पाणी भरले असून वालधुनी नदीवरील दोन लहान पूलदेखील पाण्याखाली आले आहेत. त्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.
-