तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात गँगस्टर इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता
By जितेंद्र कालेकर | Published: June 13, 2024 09:20 PM2024-06-13T21:20:38+5:302024-06-13T21:20:47+5:30
* ठाणे मकोका न्यायालयाचा आदेश: मकोका आरोपातूनही सुटका
ठाणे: बिल्डरकडून तीन कोटींची खंडणी उकळल्याच्या आरोपातून फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात पोलिस अपयशी ठरल्याने तसेच त्याला संशयाचा फायदा देण्यात आल्याचे विशेष न्यायाधीश अमित शेटये यांनी बुधवारी दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
कासकरवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा तसेच भारतीय दंड संहिता कलम ३८४ (खंडणी), ३८६ (एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती दाखवून किंवा गंभीर दुखापत करून खंडणी उकळणे) आणि ३८७ (एखाद्या व्यक्तीला भीती दाखवून खंडणी घेणे) या गुन्ह्यांसाठी हा खटला दाखल झाला हाेता. त्याच्याविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलिस ठाण्यात ३ आॅक्टोंबर २०१७ रोजी हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे तपासाला आले होते.
कासकर आणि इतर आरोपींनी उत्तर मुंबईतील गोराई भागातील ३८ एकर जमिनीच्या व्यवहाराबाबत बिल्डरकडून तीन कोटी रुपये उकळले होते, असा आरोप विशेष सरकारी वकिल क्षीरसागर यांनी केला. आरोपीचे वकील पुनित माहिमकर आणि मतिन शेख यांनी यामध्ये आरोपी निर्दोष असल्याची बाजू मांडत त्याच्यावरील आरोप खोडून काढले. शिवाय, यात सरकारी पक्षाकडे कोणतेही सबळ पुरावे नसल्याचाही युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने कासकरवरील आरोप सिद्ध झाले नसल्याने त्याची खंडणीसह मकोकाच्या आरोपातूनही निर्दोष मुक्तता केली.