ठाण्याच्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी रवी पुजारीकडून अशी आली धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:56 PM2018-11-13T22:56:16+5:302018-11-13T23:00:39+5:30
एक करोड दे नाही तर तुला दिवाळीचा बोनस देईन,’ अशा भाषेतच कळव्यातील एका व्यापाºयाला गँगस्टर रवी पूजारीच्या नावाने धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘कळव्यामध्ये तुझे गॅलेक्सीचे आॅफीस आहे, तू कोठे राहतोस, हे माहित आहे. एक करोड दे नाही तर तुला दिवाळीचा बोनस देईन,’ असे सुनावून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणारा फोन गँगस्टर रवी पूजारीच्या नावाने कळव्यातील एका व्यापा-याला करण्यात आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्टॉक मार्केटमध्ये सब ब्रोकरचे काम करणारी या व्यापाºयाची एजन्सी आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेअर बाजारातून शेअर्स घेऊन त्याची विक्री करण्याचा व्यवसाय तो करतो. सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे ३ च्या सुमारास बाहेरील देशातून त्याच्या मोबाइलवर फोन आला. पहाटेची वेळ असल्यामुळे त्याने तो घेतला नाही. पण पुन्हा त्याच दिवशी सकाळी ११.२४ वाजण्याच्या सुमारास फोन आला. समोरील व्यक्तीने या व्यापाºयाच्या नावाची खात्री केली. नंतर आपण रवी पुजारी बोलत असल्याचे सांगून कळव्यात तुझे गॅलेक्सीचे कार्यालय आहे. तू कोठे राहतोस हेही माहीत आहे. एक करोड दे नाहीतर दिवाळीचा बोनस देईल, असे बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी पहाटे तसेच पुन्हा रात्री ९ च्या सुमारासही फोन करून धमकावून समोरील व्यक्तीने पैशांची आठवण केली. त्यानंतरही ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.५४ वाजेनंतर वारंवार फोन आले. भीतीने त्यांनी तो घेतला नाही. त्यानंतर मात्र आलेल्या फोनवर या व्यापाºयाने ही रक्कम मोठी असून इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. तेंव्हा गाडी, सदनिका बुकिंगची माहिती देऊन त्याने पैसे देणार नसशील तर मुले पाठवू का तुझ्या आॅफीसला? असे सांगून पुन्हा एक कोटीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिली. वारंवार येणाºया धमक्यांना कंटाळून या व्यापाºयाने अखेर कळवा पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी तक्रार केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही याप्रकरणी समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-----------------