अंबरनाथमधून १२.५0 लाखांचा गांजा हस्तगत, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 07:03 PM2018-03-12T19:03:14+5:302018-03-12T19:03:14+5:30
गांजाची खरेदी-विक्री करणार्या तीन आरोपींना ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी अंबरनाथजवळ अटक केली.
ठाणे : गांजा खरेदी-विक्रीसाठी आलेल्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी अंबरनाथ येथून अटक केली. त्यांच्याजवळून जवळपास १२ लाख ५0 हजार रुपयांचा ८३ किलो ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केला.
अंबरनाथजवळच्या भालगाव येथे दोन आरोपी गांजा विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना रविवारी मिळाली. त्यानुसार संजय गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने भालगाव येथे सापळा रचला. त्यावेळी एका कारने दोन आरोपी तिथे गांजा विकण्यासाठी आले. त्यानंतर आणखी एक आरोपी गांजा विकत घेण्यासाठी आला. त्यांच्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये ८३ किलो ५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. गांजा विकण्यासाठी आलेल्या आरोपींमध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा येथील अनिल सुरेश पवार (२९) आणि भिवंडी तालुक्यातील कुकसा येथील प्रेमनाथ जगन्नाथ भोईर (२८) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गांजा विकत घेणाºयाचे नाव दिवेश दुर्वा वायले असून, तो अंबरनाथ तालुक्यातील भालगावचा रहिवासी आहे. गांजाची किंमत १२ लाख ५३ हजार २५0 रुपये असून, आरोपींची कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे हे करीत आहेत. आरोपींना न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पडघा येथील अनिल पवार हा गांजा विक्रीचे गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काही दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक त्याच्यावर पाळत ठेऊन होते. रविवारी ठोस माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमि तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती संजय गोडसे यांनी दिली.