गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 07:27 PM2024-02-03T19:27:34+5:302024-02-03T19:41:09+5:30
उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोर्टाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. कोर्टात पोलिसांनी हा सुनियोजीत कट असल्याचं सांगितले आहे.
काल उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्या गोळीबार केला. यात राहुल पाटील हे जखमी आहेत. या दोघांवर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
उल्हासनगर घटनेची सखोल चौकशी व्हावी; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
एका जागेसाठी या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच जागेचा वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूचे पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी दोन्ही गटात वाद वाढला. यावेळी गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. यात दोघे जखमी झाले. या प्रकरणी आमदर गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तसेच आमदार गायकवाड यांनी पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. माझा मुलगा आरोपी नव्हता तरीही त्याला आरोपी बनवण्यात आले, असंही गायकवाड यावेळी म्हणाले. गोळीबार हा सुनियोजित कोट असल्याचं पोलिसांनी सांगितले. गायकवाड यांनी गोळीबार केला, फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे, या गोळीबारानंतर बंदुक जप्त केली आहे, असं पोलिसांनी कोर्टात सांगितले.