गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन? उद्या उल्हासनगर न्यायालयात आणणार
By सदानंद नाईक | Published: February 13, 2024 09:19 PM2024-02-13T21:19:21+5:302024-02-13T21:19:41+5:30
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील २ फेब्रुवारी रोजी गोळीबाराचा प्रकार झाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदाराने गोळ्या झाडल्या.
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडीत असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर आरोपींची बुधवारी पोलीस कस्टडी संपत आहे. त्यामुळे बुधवारी गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयात आणण्यात येणार असून न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गायकवाड यांना पोलीस कस्टडी वाढून मिळते की न्यायालयीन कस्टडी मिळते. याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील २ फेब्रुवारी रोजी गोळीबाराचा प्रकार झाला असून याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर व रणजित यादव यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी १४ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली. बुधवारी पोलीस कस्टडी संपणार असल्याने, त्यांना बुधवारी उल्हासनगर न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात येणार आहे. आमदार गायकवाड यांचे समर्थक न्यायालयात गर्दी करणार असल्याने, न्यायालय परिसरात पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले आहे.
गेल्या वेळी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. त्यावेळी गायकवाड समर्थकांनी घोषणाबाजी करून न्यायालय परिसर दणाणून सोडला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ११ जनांसह ४० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलीस सतर्क झाले असून न्यायालय परिसरात समर्थकाना मनाई करण्याची शक्यता आहे. यातील गणोत्रा नावाच्या आरोपीला १६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी न्यायालयाने दिली आहे.