गणपती बाप्पानेच चक्क भरले खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 12:17 AM2019-09-02T00:17:38+5:302019-09-02T00:17:55+5:30
उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नसल्याने, शहरात रस्त्याची दुरवस्था झाली.
उल्हासनगर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊनही महापालिकेला जाग येत नसल्याच्या निषेधार्थ मनसेने गणपती बाप्पाच्या हस्ते खड्डे भरण्याचे आंदोलन केले. यानंतरही पालिकेला जाग आली नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नसल्याने, शहरात रस्त्याची दुरवस्था झाली. पावसाळयात खड्डे भरण्याची मागणी सर्वस्तरातून झाल्यावर, पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात दगड,माती, रेती, डेब्रिजने खड्डे भरण्यास सुरूवात केली. त्यानंतरही रस्त्यातील खड्डे जैसे थै राहिल्याने, ६० लाखाच्या निधीतून कोल्ड मिक्स पध्दतीने खड्डे भरण्यास सुरूवात केली. तर शुक्रवारी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी हॉट मिक्स पध्दतीने खड्डे भरण्यासाठी २ कोटीच्या निधीला मान्यता दिली. खड्डयांमुळे आतापर्यंत ३ जणांचा बळी गेल्याचा आरोप मनसेने करून छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळील सिध्दार्थनगर येथील मुख्य रस्त्यांवरील खड्डे गणपती बाप्पाच्या हस्ते भरण्याचे आंदोलन करून पालिका कारभाराचा निषेध केला.
शहरात मनसे विरोधी पक्षाची भूमिका वठवित असून रस्ते खड्डे भरण्याच्या आंदोलनात शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, कामगार नेते दिलीप थोरात यांच्यासह पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे बाप्पाचे आगमन खड्डयातून होणार असून विसर्जनही खड्डयातून होण्याची शक्यता यावेळी त्यांनी व्यक्त केली.