ठाणे महानगरपालिकेच्या हरित व्यवस्थापन केंद्रातील कचऱ्याला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 08:49 AM2022-03-26T08:49:33+5:302022-03-26T08:49:47+5:30
हरित कचरा व्यवस्थापन केंद्र ठाणे महानगरपालिकेच्या मालकीचे असून त्या केंद्राचे देखरेख करण्याचे काम समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेकडे आहे.
ठाणे : कोपरी,कन्हैया नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या हरित व्यवस्थापन केंद्र मधील सुकलेल्या पालापाचोळा, लाकडाचे साहित्य आणि हरित कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना पहाटे शनिवारी ३.२० वाजण्याच्या सुमारास समोर आली. त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठामपाच्या हरित कचरा व्यवस्थापन केंद्रातील सुकलेल्या पालापाचोळा, लाकडाचे साहित्य आणि हरित कचरा याला आग लागल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. तेथे पालापाचोळा आणि लाकडाचे साहित्य असल्याने आग हळूहळू वाढत होती. मात्र तात्काळ त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन्ही विभागांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यावर आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
यावेळी,३- फायर वाहन, ३-वॉटर टँकर, १- रेस्क्यू वाहन आणि १- जेसीबी वाहन असे पाचारण केले होते. तसेच हरित कचरा व्यवस्थापन केंद्र ठाणे महानगरपालिकेच्या मालकीचे असून त्या केंद्राचे देखरेख करण्याचे काम समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेकडे आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.