लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील कचरा नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:54 AM2018-07-20T03:54:09+5:302018-07-20T03:55:23+5:30
रेल्वे प्रशासनाने सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड ठोठावला
कल्याण : दादर-बडोदा या भूज एक्स्प्रेसमधील कचरा तापी नदीच्या पात्रात टाकला जात असल्याची तक्रार कल्याणमधील स्वच्छतादूत विजय भोसले (रा. भोसले चाळ, काटेमानिवली) यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली होती. त्याची दखल तत्परतेने घेत रेल्वे प्रशासनाने सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. या कारवाईचे पत्र रेल्वेने भोसले यांना पाठवले आहे. तक्रारीची दखल घेऊन तत्परतेने कारवाई केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे भोसले यांनी कौतुक केले.
भोसले हे मे महिन्यात काही कामानिमित्त बडोदा येथे गेले होते. भूज एक्स्प्रेसने ते मार्गस्थ होत असताना तापी नदीत एक्स्प्रेसमध्ये जमा झालेला कचरा तेथील सफाई कर्मचा-यांकडून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत भोसले यांनी संबंधित कर्मचाºयांकडे विचारणा केली असता, असा कचरा आम्ही नेहमीच नदीत टाकतो, असे उद्धट उत्तर त्यांना दिले. दरम्यान, या प्रकाराची तक्रार भोसले यांनी गोयल यांच्याकडे १२ मे रोजी केली होती.
याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने भोसले यांना नुकतेच पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तक्रारीवर सफाईचे काम करणाºया कंत्राटदाराला दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे.