राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद
By कुमार बडदे | Published: August 19, 2023 05:09 PM2023-08-19T17:09:05+5:302023-08-19T17:09:22+5:30
कचरा संकलन केंद्र अखेर शनिवारपासून बंद करण्यात आले.
मुंब्रा : येथील नागरी वसाहती मधून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील रस्त्यावरील कचरा संकलन केंद्र अखेर शनिवारपासून बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पादचारी आणि वाहन चालकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून शहरातील विविध ठिकाणचा कचरा जमा करुन तो प्रथम कौसा भागातील तनवर नगर येथील रस्त्यावर जमा करुन नंतर तो मोठ्या डंपर मधून डम्पिंग ग्राऊंड वर नेला जात होता.
ही प्रक्रिया मागील अनेक महिन्यां पासून सुरु होते.यामुळे दिवसातील बहुतांशी वेळ तेथे कचऱ्याचा ढीग साचून रहात होता.त्यातून पसरणाऱ्या असाह्य दुर्गधीमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना तेथून वाहन चालवताना नाक मुठीत धरावे लागत होते. यामुळे हे केंद्र बंद करण्यात यावे. यासाठी एमआयएमचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांनी १० दिवसांमध्ये हे केंद्र बंद करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवार पासून केंद्र बंद करण्यात आले.
ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीला दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी तनवर नगर जवळील कचरा संकलन केंद्र शुक्रवार पासून बंद केले आहे. - बाळू पिचड, सहाय्यक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती.