रस्त्यावर कचरा टाकणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:10+5:302021-09-08T04:48:10+5:30
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर स्थानिकांकडून उघड्यावर कचरा टाकणे सुरूच आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत असून ...
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर स्थानिकांकडून उघड्यावर कचरा टाकणे सुरूच आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत असून भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही कचरा रस्त्याच्या बाजूकडील पदपथावरही पडत असल्याने पादचाऱ्यांना त्या ठिकाणाहून जाताना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
नागरिक याला जबाबदार असताना केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून कचरा पूर्णपणे उचलला जात नाही. त्यामुळे बाकीचा कचरा त्याठिकाणीच पडून यात रोगराईला आमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
केडीएमसीने शून्य कचरा मोहिमेंतर्गत कचराकुंडीमुक्त शहर, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकामी गृहसंकुलात प्रकल्प उभारणे ही संकल्पना राबविली. ती बहुतांशी यशस्वीही झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच आधारवाडी डम्पिंगवर टाकला जाणारा कचरा कमी करून ते डम्पिंग पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, आजही काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याची प्रवृत्ती नागरिकांची जैसे थेच आहे. याप्रकरणी दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल होऊनही फारसा फरक पडलेला नाही. रस्त्यावरील कचरा वेळेवर सफाई कामगारांकडून उचलला जात नसल्याच्या तक्रारीही मनपाकडे दाखल होतात. त्याचबरोबर रस्त्यावर साफसफाईकामी नेमलेल्या कामगारांकडून योग्य प्रकारे सफाई होत नसल्याच्या तक्रारींचाही यात समावेश आहे. डम्पिंगचा विषय मार्गी लावल्यानंतर आता शहर स्वच्छ कसे राहील, याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष केंद्रित केले होते. रस्त्यावरील कचरा दररोज उचलला जातो की नाही, सफाई कामगारांकडून स्वच्छता नियमित होते की नाही, घंटागाडी वेळेवर येते का? यावर वॉच ठेवला जाणार होता. एकूणच चित्र पाहता या सर्व बाबी कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.