भंडार्ली प्रकल्पासाठी आता एक आठवड्याचा अल्टिमेटम, अन्यथा...
By अजित मांडके | Published: July 15, 2023 03:01 PM2023-07-15T15:01:38+5:302023-07-15T15:16:00+5:30
जोपर्यंत मुख्यमंत्री आश्वासन देत नाहीत तोपर्यंत भंडार्ली प्रकल्पाच्या ठिकाणी एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा स्थानिकानी दिला.
ठाणे : एक वर्षात भंडार्ली कचरा प्रकल्प बंद केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु वर्षभरानंतरही हा प्रकल्प सुरु असल्याने येथील शेतकºयांचे नुकसान झाले असून, घाणीने आणि दुर्गंधीने येथील नागरीक त्रस्त झाल्याने अखेर शुक्रवारी हा प्रकल्प बंद पाडल्यानंतर शनिवारी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवासी महापालिकेत धडकले. यावेळी एका आठवड्यात मुख्यमंत्रीची भेट झाली नाही तर शनिवार पासून भंडार्ली प्रकल्प बंद केला जाईल असे अल्टिमेटम रहिवाशांनी पालिकेला दिले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
दिवा येथील डम्पिंग बंद करुन ठाणे महापालिकेने भंडार्ली येथे तात्पुरता स्वरुपात कचरा प्रकल्प उभारला आहे. परंतु शुक्रवारी मनसेचे आमदार प्रमोद पाटील आणि स्थानिकांनी हा प्रकल्पच बंद पाडला. त्यानंतर शनिवारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असल्यामुळे या प्रकल्पाचा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि दुगंर्धी येणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. परंतु स्थानिकांनी केलेल्या आरोपामुळे हा दावा फोल कसा ठरला याचे पुरावेच यावेळी सादर केले. कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचबरोबर नागरिक दुगंर्धीने हैराण झाले आहेत.
विहीरीतील पाणी खराब झाले आहे, अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत आदी समस्या यावेळी रहिवाशांनी मांडल्या. या प्रकल्पांच्या बदल्यात १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचीही सरकारने अद्याप पूर्तता केली नसल्याचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी सांगितले. या शिवाय हा प्रकल्प करीत असतांना येथील रहिवाशांना रस्ता दिला जाईल, इतर सोई सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्याची देखील अद्याप पुर्तता झाली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट होताना दिसत नाही, अशी टीका आमदार पाटील यांनी केली आहे.
दरम्यान महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भंडार्ली प्रकल्प बंद करण्यासाठी पुढील दोन महिन्यांची मुदत द्यावी अशी विनंती केली. १५ सप्टेंबरच्या आत येथील कचरा प्रकल्प बंद केला जाईल आणि डायघर प्रकल्प सुरु केला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. परंतु रहिवासी त्यांचे म्हणने ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. आधी मुख्यमंत्र्याची भेट घडवून आणा अन्यथा कचरा टाकू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावर आयुक्तांनी येत्या शुक्रवारच्या आत मुख्यमंत्र्यासमेवत भेट घालून दिली जाईल आणि तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले.
तसेच येथील रस्त्याची, दुर्गंधीची समस्या तत्काळ सोडविली जाईल. रहिवाशांना या प्रकल्पाचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय १४ गावांचा समावेश करण्याबाबत संबधींताशी चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. अखेर शुक्रवार पर्यंत मुख्यमंत्र्यासोबत मिटींग लागली नाही तर शनिवार पासून भंडार्लीचा प्रकल्प बंद केला जाईल असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याबरोबर, फवारणी, दुर्गंधी दुर व्हावी आणि रस्त्याचे कामही केले जावे असेही त्यांनी सांगितले.