खिल्ली उडवल्याने ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:19 AM2021-03-09T00:19:07+5:302021-03-09T00:19:25+5:30

पठाण यांची कृती : ...तर अधिकाऱ्यांच्या दालनात फेकणार कचरा

Garbage dumped in contractor's office | खिल्ली उडवल्याने ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला कचरा

खिल्ली उडवल्याने ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला कचरा

Next
ठळक मुद्देमुंब्रा येथे अभिषेक कन्स्ट्रक्शन आणि अमृत एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, या कंपन्यांचे कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार कचरा उचलतात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कचरा उचलण्यास नकार देऊन नागरिकांची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांनी कचराकुंडीत जमा झालेला कचरा दुचाकीवरून नेऊन सोमवारी ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला. दरम्यान, ठाणे महापालिकेमध्ये कचऱ्यात मोठ्या  प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असून ही समस्या निकाली न लावल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकू, असा इशारा पठाण यांनी दिला. 

मुंब्रा येथे अभिषेक कन्स्ट्रक्शन आणि अमृत एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, या कंपन्यांचे कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार कचरा उचलतात. किस्मत कॉलनी आणि दारुल फलाड परिसरात कचऱ्यातील लाकूड आणि गाद्या  आदी न उचलता ते कचराकुंडीत किंवा आजूबाजूला फेकून देतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही कचरा उचलण्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी पठाण यांच्याकडे तक्रार केली होती.  यासंदर्भात पठाण यांच्यासमोरच दूरध्वनीवरून अमृत एंटरप्रायजेस कार्यालयात संपर्क साधण्यात आला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी कचरा उचलण्यास तर नकार दिलाच; शिवाय, तक्रार करणाऱ्यांची खिल्ली उडविली. त्यामुळे संतापलेल्या पठाण यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास थेट किस्मत कॉलनी परिसर गाठला. त्या ठिकाणी अमृत एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकीची कचऱ्याची गाडी उभी होती. 

या गाडीतील कर्मचारी कचरा उचलत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पठाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाच कचरा गोणींमध्ये भरून दुचाकीवरून रेतीबंदर येथील अमृत एंटरप्रायझेस आणि अभिषेक कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेऊन ओतला. कचऱ्याबाबतीत ठाणे महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांना मलिदा मिळत असल्याने ते अशा ठेकेदारांवर कारवाई करीत नाहीत. आता आपण या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असून कचरा उचलण्याची ही चुकीची पद्धत संपुष्टात न आल्यास घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन आपण कचरा फेकणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Web Title: Garbage dumped in contractor's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.