दुकानांसमोर कचरा टाकणारे मोकाटच
By Admin | Published: April 26, 2017 12:25 AM2017-04-26T00:25:42+5:302017-04-26T00:25:42+5:30
कचऱ्यावर कर लावल्यानंतर तो न भरण्याचा निर्धार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पालिकेने कठोर पावले उचलून मागील
ठाणे : कचऱ्यावर कर लावल्यानंतर तो न भरण्याचा निर्धार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पालिकेने कठोर पावले उचलून मागील महिन्यात त्यांच्या दुकानांसमोरच कचरा फेको आंदोलन केले होते. त्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनीदेखील नौपाडा प्रभाग समितीच्यासमोर कचरा फेकून परतफेड करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांमुळे संपूर्ण ठाण्याचे वातावरण ढवळून निघाले होते. व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, एक महिना झाल्यानंतरही दुकानांसमोर कचरा टाकणारे ते अधिकारी अद्याप मोकाटच फिरत असल्याचे चित्र आहे.
मागील महिन्यात २३ मार्च रोजी सकाळ सकाळी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कचरा कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकला होता. या कचरा नाट्याच्या वेळी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आक्र मक झाले होते.
त्यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आदींना प्रशासनाने दोन दिवसात दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना दिलेले ते आश्वासन पोकळ ठरल्याने दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरून कचरा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल त्यामुळे वाढल्याचे मानले जात आहे. तसेच याप्रकरणी घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तसेच त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्यावरदेखील कारवाई करण्याची मागणी केली होती.
महापालिकेच्या घनकचरा विभागाला प्रशासनाने कचरा टॅक्स वसुलीतून दोन कोटी रुपयांचे लक्ष दिले होते. त्यातील केवळ ५१ लाखापर्यंतचीच वसुली झाली आहे. अशावेळी ती झाली नाही तर संबधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. अशावेळी कर वसुलीसाठी कोणतेही तारतम्य न ठेवता नौपाडा भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर कचरा आणून टाकण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी हा कचरा आम्ही टाकलाच नसल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु, पालिकेचे कर्मचारी आणि काही अधिकारी कचरा टाकतांना कॅमऱ्यात बंद झाल्याचे पुरावेच व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना सादर केले होते. त्यावेळी व्यापाऱ्यांनी थेट महापालिकेत धडक देऊन संबधित दोषींवर कारवाईची मागणी केली होती. (प्रतिनिधी)