शिवसैनिकांकडून कचरा भेट

By admin | Published: May 23, 2017 01:32 AM2017-05-23T01:32:47+5:302017-05-23T01:32:47+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभागांमध्ये कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी

Garbage gift from Shiv Sainik | शिवसैनिकांकडून कचरा भेट

शिवसैनिकांकडून कचरा भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभागांमध्ये कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी विभागीय कार्यालयावर धडक देत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कचऱ्याचा बॉक्स भेट दिला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना फेरीवाल्यांचा प्रश्न असो की कचऱ्याचा शिवसेनाच आक्रमक होऊन आंदोलन करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहर स्वच्छतेच्या मानांकनात घसरण झाल्याने मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेनेवर आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.
शिवसेनेचे सभापती रमेश म्हात्रे यांनी मागील स्थायी समितीच्या सभेत प्रशासनावर तोफ डागत घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या आंदोलनात शिवसैनिकांनी डोंबिवली पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ६९ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ शाखाप्रमुख नाईक यांच्यासह विभागप्रमुख कुणाल ढापरे, विशाल कराळे, युवाशाखा अधिकारी सूरज पटवा आणि सचिन कुलकर्णी, विशाल सरडे, पार्थ रामाणी आदींनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कचऱ्याने भरलेला बॉक्स भेट दिला. यापुढे जर दररोज कचरा साफ केला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करील, असा इशारा दिला. दरम्यान कचरा उचलला जात नाही या शिवसेनेच्या आरोपाचा अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
फेरीवाला अतिक्रमणाविरोधात गेल्या आठवड्यात युवासेना आक्रमक झाली होती. रविवारी पुन्हा एकदा शिवसेनेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. यासंदर्भात शाखाप्रमुख नाईक यांच्याशी संपर्क साधला असता सत्ता कोणाचीही असो नागरीकांना होणाऱ्या अडचणी सोडवणे हेच शिवसैनिकांचे काम आहे आणि ते शेवटपर्यंत करीत राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Garbage gift from Shiv Sainik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.