अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन
By पंकज पाटील | Published: April 2, 2023 03:18 PM2023-04-02T15:18:05+5:302023-04-02T15:18:25+5:30
अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
अंबरनाथ: अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी चक्क बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप केले.
अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पूल परिसरात पुलाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. इथून वाहणाऱ्या वालधुनी नदीत नेहमीच केमिकलयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच इथे साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीत भर पडत असून पुलाच्या दोन्ही बाजूला विद्रूप अवस्था पाहायला मिळत आहे. गोविंद पुलाचा हा रस्ता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणारे पर्यटक याच रस्त्याने शिवमंदिराकडे जातात. त्यामुळे अशी घाण पाहून शहराची प्रतिमा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मनात चुकीची तयार होत असल्याचा आरोप भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने केला आहे.
याबाबत पालिकेला अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी गोविंद पुलावर बसून हाती बोर्नव्हिटा आणि बदाम घेत आंदोलन केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती कमी झाली असून त्यामुळे त्यांना आम्ही बदाम आणि बोर्नव्हिटा देत असल्याचे यावेळी आंदोलन करणारे प्रकाश नलावडे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"