आंदोलनासाठी हवा काढलेल्या वाहनांमुळे कचरा उचलण्यास विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 11:40 AM2018-10-19T11:40:24+5:302018-10-19T11:43:12+5:30
ठेकेदाराने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्यामुळे डोंबिवलीत खंबाळपाडा डेपोमध्ये कचरा वाहक घंटागाडी आणि सफाई कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले होते.
डोंबिवली - ठेकेदाराने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्यामुळे डोंबिवलीत खंबाळपाडा डेपोमध्ये कचरा वाहक घंटागाडी आणि सफाई कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अज्ञातांनी वाहनांची हवा काढली होती, त्यामुळे आयुक्तांच्या आश्वासनानंतर तीन तासात आंदोलन मागे घेण्यात आले, परंतू हवा काढलेली 40हून अधिक वाहने त्या दिवशी रस्त्यावर न धावल्याने दसऱ्यालाही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून आले.
पण यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही वाहनांची हवा काढलेली नाही, कोणी काढली ते आम्हाला माहिती नाही. महापालिका प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा. त्यामुळे हवा कोणी काढली हे मात्र स्पष्ट झाले नसले तरी घनकचरा विभागाला या सगळयाचा मनस्ताप मात्र झाला होता. वाहनांची हवा काढण्याला नेमके जबाबदार कोण? हे कृत्य करत असताना खंबाळपाडा आगारातील सुरक्षा रक्षकांचे लक्ष नव्हते का? असा सवाल महापालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी विलास जोशी यांना केला असता ते म्हणाले की, आमच्या सुरक्षा रक्षकांनी भिंतीवरून येत कोणी हवा काढली हे पाहिले आहे, पण आता समस्या सुटली असल्याने त्या विषयाच्या खोलात न जाता आता यापुढे कोणी आंदोलन करणार असेल तर मात्र पोलिस व्हॅन बोलावून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मानस असेल.
जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतन संदर्भात ठिय्या आंदोलन केले, तो त्या कामगारांचा प्रश्न होता, पण त्यासाठी वाहनांचे नुकसान करणे योग्य नव्हते. 15 आरसी गाड्या, आणि सुमारे 25 घंटागाड्यांची हवा काढल्याने ठिकठिकाणच्या जागेवर कॉम्प्रेसर लावणे, वाहन सुस्थितीत आणणे यामध्ये वेळ गेला. परिणामी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत गाड्या रस्त्यावर धावल्या नाहीत. त्याचा परिणाम गुरूवारी दसऱ्याला झाला आणि कचरा विल्हेवाटीच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरले. यापुढे अशी समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात येणार असून जे कोणी असे कृत्य करेल त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे नेमकी हवा कोणी काढली हे मात्र अनुत्तरीतच असून ज्यांनी काढली हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा संबंधितांवर काय कारवाई करायची याबाबतचे प्रशासनाचे कोणतेही धोरण नाही हे देखिल स्पष्ट झाले. दरम्यान, त्या कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन शुक्रवारी सकाळी पहिल्या सत्रात आरटीजीएस पद्धतीने केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.