ऐन सणासुदीत शहरात कचराकोंडी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:22 AM2018-10-17T00:22:55+5:302018-10-17T00:23:07+5:30
तीन महिने वेतन थकले : कंत्राटी कामगारांचे आजपासून ठिय्या आंदोलन
कल्याण : केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असताना दुसरीकडे वेतनाच्या मागणीसाठी बुधवारपासून त्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने घेतला आहे. त्यामुळे ऐन सणात शहरात कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस’ने १२० घंटागाडीचालक व २८० सफाई कामगार, असे ४०० कामगार केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास पुरविले आहेत. परंतु, तीन महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यातच कंत्राटदार व पालिका यांच्यात झालेल्या करारानुसार वेतन दिले जात नसल्याने युनियनने महात्मा फुले चौक पोलिसात कंत्राटदार व पालिकेचे अधिकारी यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
मात्र, महापालिकेकडूनच बिल न मिळाल्याने तीन महिने वेतन देता आलेले नाही, असे कंत्राट कंपनीचे संचालक श्रीरंग लांडे यांचे म्हणणे आहे. तर, वेतन न मिळाल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी सांगितले.
दरम्यान, तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कंत्राटी कामगारांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुधवारपासून काम बंद करीत ठिय्या मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. एकही कचºयाची गाडी बाहेर पडणार नाही, असा पवित्रा घेतल्याने युनियन आणि कंत्राटदार कंपनीच्या वादात शहरात कचºयाचे ढीग जागोजागी दिसण्याची शक्यता आहे.
...तरच कचरा गाड्या बाहेर पडतील
कामगारांना तीन महिने वेतन मिळालेले नाही. सणासुदीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. वेतन मिळाल्यावरच कचरागाड्या बाहेर पडतील, अन्यथा आंदोलन सुरूच राहील. वेतन थकल्याबाबत प्रशासनाला माहिती आहे. मग आंदोलनाबाबत कशाला माहिती द्यायची, त्यांनी कामगारांची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे, असे मत युनियनचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी व्यक्त केले.
प्रशासन अनभिज्ञ
केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर म्हणाले, की त्यांना या आंदोलनाबाबत कोणतीही माहिती नाही. युनियनने असे कोणतेही निवेदन प्रशासनाला दिलेले नाही. वेतनासंदर्भात कंत्राटदाराशी बोलणी सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.