मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला
By धीरज परब | Published: February 18, 2023 11:07 PM2023-02-18T23:07:51+5:302023-02-18T23:08:21+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली.
मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली. महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे प्रक्रिया न करताच अनेक वर्ष टाकलेल्या कचऱ्याचे तेथे डोंगर निर्माण झाले आहेत. सदर डोंगरास सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास कचऱ्याच्या डोंगरास भीषण आग लागली.
रात्रीच्या वेळी लागलेल्या ह्या भीषण आगीमुळे डोंगर पेटल्याच्या ज्वाळा थरकाप उडवणाऱ्या होत्या. अगदी भाईंदरवरून देखील आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. त्यातच वाऱ्याने आग आणखी भडकली. शिवाय कचऱ्याच्या डोंगरातील पेटते प्लास्टिक आजूबाजूला उडू लागल्याने काही झुडपात देखील आग लागली.
मीरा भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला.
— Lokmat (@lokmat) February 18, 2023
(व्हिडीओ - धीरज परब) pic.twitter.com/nVVYbHwJbE
आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध अग्निशमन केंद्रातील जवान अग्निशामक यंत्र व टॅंकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे व इतकी भीषण आग पहिल्यांदाच लागलेली असून ती विझवण्यास दिवस जातील असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कचऱ्याच्या घातक धुराचे साम्राज्य आजूबाजूच्या नागरी वस्तीमध्ये पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास देखील त्रास जाणवत होता. कचऱ्याच्या डोंगरावर शास्त्रोक्त प्रक्रिया वेळीच पालिकेने केली नसल्याने ह्याठिकाणी सातत्याने आगी लागत आहेत. तर कचरा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जात असल्याचा आरोप लोक करत आहेत.