अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी
By पंकज पाटील | Published: October 10, 2023 07:37 PM2023-10-10T19:37:13+5:302023-10-10T19:39:21+5:30
फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांकडून जप्त केलेला माल तसाच ठेवण्यात आला आहे. जे कार्यालय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ठिकाण आहे त्याच ठिकाणी फेरीवाल्यांचा कचरा आणून टाकला जात असल्यामुळे संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. अंबरनाथच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर अतिक्रमण विभागाचा कार्यालय ठाण्यात आला आहे. या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचारी काम करीत असतात.
अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर जो माल जप्त केला जातो तो माल ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित अधिकारी थेट कार्यालयातच हा सर्व कचरा आणि जप्त केलेला माल तसाच ठेवत आहेत. भाजी आणि फळांच्या टोपल्या देखील याच ठिकाणी ठेवल्या जात असल्यामुळे संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. नवीन प्रशासकीय इमारत कॉर्पोरेट दर्जाची तयार केलेली असली तरी या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती मात्र अद्यापही बदललेली नाही. फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे.