भिवंडीतील उड्डाणपुलाखाली साचले कचऱ्याचे ढीग; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By नितीन पंडित | Published: April 26, 2023 06:05 PM2023-04-26T18:05:02+5:302023-04-26T18:05:16+5:30
भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.
भिवंडी: भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील अनेक ठिकाणी मुख्य चौकांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातच आता मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आलेल्या जागेवरच कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. महापालिकेच्या या दुर्लक्षित कारभारामुळे भिवंडी मनपाच्या स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांवरून पाहिला मिळत आहेत.
शहरातील वंजारपट्टी नाका येथे असलेल्या स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलाखाली महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण केले आहे. मात्र या सुशोभीकरण केलेल्या जागेवरच नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली असून या सुशोभीकरण झालेल्या ठिकाणीच आता कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत.
मागील आठ महिन्यांपासून भिवंडी महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला असल्याने महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने प्रशासकीय कार्यकाळात शहरातील कचऱ्याची समस्या बिकट बनली आहे. शहर स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ योग्य ती उपाययोजना राबविणार का याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.