ऐन दिवाळीच्या तोंडावर भिवंडीत कचऱ्याचे ढीग; मनपा प्रशासनाविरोधात नागरिक संतप्त
By नितीन पंडित | Published: November 9, 2023 05:06 PM2023-11-09T17:06:22+5:302023-11-09T17:06:52+5:30
भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.
भिवंडी : शहरात कचऱ्याची समस्या नेहमीच गंभीर बनलेली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने महापालिका प्रशासनाच्या या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.
शहरात दररोज साडेचारशे टन कचरा उचलला जात असून हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासने आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट् प्रा. लि.या कंपनीस प्रति टन १२२९ रुपये दर निश्चित करून सहा वर्षांसाठी ठेका दिला आहे.यासाठी ठेकेदाराला सुमारे २२ कोटी ७५ लाख ७४ हजार ५२७ रुपये वार्षिक दिले जाणार आहेत.यासाठी मनपाने ठेकेदाराला ५० घंटागाड्या व २३ रेफ्युज कलेक्टर अशी सुमारे १० कोटी रुपयांची वाहनेनाममात्र १ रुपया प्रतिमहा भाडयाने ठेकेदाराला आंदण दिली आहेत.
एकीडे कोट्यावधीची वाहने ठेकेदाराला आनंद देऊन महापालिका प्रशासनाने आधीच ठेकेदारांवर मेहरबानी केली आहे.मात्र दुसरीकडे कचरा उचलण्यात ठेकेदाराची हलगर्जी होत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर आलेले आहेत. जेव्हा जेव्हा शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले असतात त्यावेळेस महापालिका प्रशासनाच्या वतीने ठेकेदार निलंबित करून दुसरा ठेकेदार नियुक्त करण्यात येईल असे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून भिवंडी कल्याण मार्गावरील नवी वस्ती येथील वेलकम हॉटेलच्या समोरच रस्त्याच्या मधोमध कचऱ्याचा प्रचंड ढीग साचला आहे.त्यामुळे नागरिकांना नाक मोठी धरून येथून प्रवास करण्याची वेळ आली आहे.