मीरा-भाईंदर मध्ये उघड्यारील कचरा कुंड्यां मुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:26 PM2022-01-06T18:26:22+5:302022-01-06T18:26:45+5:30
मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड -
मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रोगराईचा धोका कायम आहे.
मीरा भाईंदर महापालिका हि स्वच्छ भारत सर्वेक्षणात शासन स्तरावर शहर कचराकुंडी मुक्त शहर असल्याचा दावा करते . शहरात कचरा कुंडी नसल्याचे खोटे सांगून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात पालिकेचा हातखंडा आहे . परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात ठिकठिकाणी आजही कचरा कुंड्या कायम आहेत . शहरातील झोपडपट्टी व गावठाण भागातच नव्हे तर इमारती क्षेत्रात देखील कचरा कुंड्या सर्रास सुरु आहेत .
वास्तविक महापालिकेने कचरा गोळा करण्यासह साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे अपेक्षित असताना झोपडपट्ट्या, गावठाण व चाळी क्षेत्रात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. तर ज्या ठिकाणी कचरा गोळा केला जातो तो एकत्र आणून त्याच भागातील एखाद्या मोकळ्या जागेत टाकला जातो . तर काही ठिकाणी परिसरातील रहिवाशी कचरा आणून जवळच्या मोकळ्या जागेत टाकत असतात .
ओला व सुका कचरा वर्गीकरण न करताच एकत्र आणून रस्त्या व मोकळ्या जागेत टाकला जात असल्याने त्या बेकायदा कचरा कुंड्यांच्या ठिकाणी कचरा सर्वत्र अस्ताव्यस्त पसरतो. त्यावर मोकाट गुरं , श्वान गोळा होतात. कचरा सर्वत्र पसरतो आणि दुर्गंधी पसरते. परिसरात घाणीचे साम्राज्य असते. उत्तन , मोरवा , गणेश देवल नगर आदी भागात तर कांदळवनातच पालिकेने अश्या बेकायदा कचरा कुंड्या चालवल्या आहेत.
शहरातील ह्या कचरा कुंड्यांवर एकत्र गोळा होणारा कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घनकचरा प्रकल्पात न्यावा लागत आहेत . जेणे करून अनेक भागातील कचरा हा एक ते दोन दिवस उचलला जात नाही . परिणामी घाणीचे साम्राज्य पसरून रोगराईची भीती वाढली आहे. परंतु महापालिका मात्र ह्या बेकायदा कचरा कुंड्या बंद करून कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देत आहेत. पालिका नागरिकांकडून घनकचरा शुल्क वसूल करत आहे मात्र घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.