कचराप्रश्नी केडीएमसीने हात झटकले
By admin | Published: April 27, 2017 11:50 PM2017-04-27T23:50:51+5:302017-04-27T23:50:51+5:30
रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला राथ रोडनजीकच्या मधल्या पादचारी पुलाखालील कचऱ्याला मागील शुक्रवारी आग लागली.
डोंबिवली : रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला राथ रोडनजीकच्या मधल्या पादचारी पुलाखालील कचऱ्याला मागील शुक्रवारी आग लागली. महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांमुळे हा कचरा होतो, अशी टीका रेल्वे अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, ती खोडून काढत तेथे फेरीवाले बसू नये, यासाठी महापालिकेतर्फे नेहमीच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे हा कचरा फेरीवाल्यांनी टाकलेला नसून त्यांचा आगीशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिले आहे. डोंबिवलीतील आगीसंदर्भात घरत यांनी अग्निशमन दल आणि सहायक आरोग्य अधिकारी, ‘ग’ प्रभाग अधिकारी यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागितला होता. त्याआधारे त्यांनी ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
राथ रोडवर बसणारे रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स सामान, फळे, भाजीपाला इत्यादी विक्रेते तसेच पादचारी पुलावरील विक्रेते आग लागली, तेथे कचरा टाकतात, असे स्थानक प्रबंधकांचे म्हणणे आहे. हा कचरा दररोज केडीएमसीच्या ‘ग’ प्रभागामार्फत वाहन पाठवून रेल्वे व महापालिकेच्या समन्वयाने उचलला जातो. स्थानक परिसर व पादचारी पुलावर कचरा होणार नाही, यासाठी फेरीवाल्यांना तेथे मज्जाव केला जातो, असे घरत यांनी म्हटले आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार आग लागल्याची माहिती दूरध्वनीवरून महापालिकेच्या एमआयडीसी अग्निशमन केंद्रास मिळाली. घटनास्थळावर अग्निशमन अधिकारी जाताच या आगीवर पाणी मारून ती विझवण्यात आली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, रेल्वे रुळांलगत असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. ती जागा ही रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत येते.
आग रेल्वे हद्दीत लागली असली, तरीही तो एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचरा तेथे आलाच कसा, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. तेथे कचरा आहे, हे कोणाला माहीत होते का? तेथे सीसी कॅमेरे आहेत का, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. (प्रतिनिधी)