पगार थकल्याने कचरा गाडीवरील कामगारांचे ‘कामबंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:04+5:302021-06-24T04:27:04+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या कचरा कंत्राटदाराने त्याच्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचा पगार दिला नसल्याने संतप्त कामगारांनी बुधवारी काम बंद ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या कचरा कंत्राटदाराने त्याच्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचा पगार दिला नसल्याने संतप्त कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात कचरा उचलला गेला नाही.
केडीएमसीने चार प्रभागांतील कचरा उचलण्याचे कंत्राट आर ॲण्ड डी या कंपनीला दिले आहे. मनपा वर्षाला कंत्राटदाराला या कामापोटी १०७ कोटी रुपये बिल अदा करते. या कंपनीकडे २५० कामगार आहेत. या कामगारांपैकी ५० कामगारांनी बुधवारी कचरा न उचलता काम बंद आंदोलन केले. गौरीपाडा आणि वालधुनी परिसरात कामगारांनी आंदोलन केल्याने तेथील कचरा उचलला गेला नाही. परिणामी तेथे कचऱ्याचे ढीग पडून असल्याचे दिसून आले.
कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून कंपनीने पगार दिलेला नाही. तीन महिन्यांचा पगार थकविल्यानंतर एक महिन्याचा पगार देऊ केला आहे. त्यातही २० टक्के कपात करून दिली जात आहे. कोरोनाकाळात नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी कचरा उचलणाऱ्या कामगारांनी जिवाची पर्वा न करता कचरा उचलला आहे.
दरम्यान, या कामगारांचा पगार थकल्याने अनेकांना आपल्या मुलांच्या शाळेची फी भरता आलेली नाही. घरात रेशन नाही, आदी समस्या भेडसावत असल्याची व्यथा कामगार हिरा भोईर यांनी मांडली. आम्हाला आमचा पगार द्यावा. आधीच आमचा पगार कमी आहे. त्यात कपात केली तर आमच्या हाती काय पडणार, असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे.
------
कंत्राटदार कंपनीला प्रशासनाने समज दिली आहे. काम योग्य प्रकारे न केल्यास कंपनीला प्रशासनाकडून दंड आकारला जातो. हा दंड आकारल्याने कंपनी कामगारांच्या पगारातून कपात करून दंडाची रक्कम भरून काढत असावी. मात्र, हा सगळाच प्रकार अयोग्य आहे. कामगारांना त्रास झाल्यास कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई केली जाईल.
- रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी
---------------------------