घोडबंदररोडवरील घंटागाड्या बंद! सोसायट्यांबाहेर कचरा पडून
By अजित मांडके | Updated: July 15, 2024 15:39 IST2024-07-15T15:39:09+5:302024-07-15T15:39:40+5:30
ठाणे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यु, मलेरिया आणि एच ३ एन २ आजाराचे रुग्ण आढळले आहेत.

घोडबंदररोडवरील घंटागाड्या बंद! सोसायट्यांबाहेर कचरा पडून
ठाणे : शहरात साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव वाढत असतानाच, शहरातील घोडबंदर रोडवरील ब्रह्रांड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत भागात कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्या आहेत. परिणामी सोसायट्या व इमारतींच्या गेटबाहेर ड्रममध्ये कचऱ्याचे ढीग झाले आहेत. या संदर्भात तत्काळ दखल घेण्याची मागणी भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ठाणे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यु, मलेरिया आणि एच ३ एन २ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य व साथीच्या आजारांचा धोका असतानाच, शहरात स्वच्छता गरजेची आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऐन मुसळधार पावसात ठाण्यात ठिकठिकाणी कचरा साचला असल्याचे चित्र दिसत आहे. इतकेच नव्हे, तर प्रभाग क्र. २ मधील घोडबंदर रोडवरील ब्रह्रांड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत भागात दररोज सकाळी कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्या आहेत. परिणामी प्रत्येक सोसायटीच्या बाहेर ड्रममध्ये कचरा साचला आहे. काही ठिकाणी कचऱ्याने ड्रम भरल्यामुळे रस्त्यावर कचरा पसरत आहे. त्यात पावसामुळे ओला कचरा कुजण्याची भीती आहे. या परिस्थितीत रोगाला आमंत्रण मिळण्याची भीती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात माहिती घेतल्यानंतर, सी. पी. तलाव येथील कचरा संकलन केंद्राबाहेर कचऱ्याने भरलेल्या डंपरची रांग लागली असल्याचे निदर्शनास आले. सी. पी. तलाव येथे कचऱ्याचे ढीग असून, तेथून कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये नेला जात नाही. त्यामुळे डंपरमधील कचरा उतरवून घेतलेला नाही. या गंभीर परिस्थितीमुळे शहरात कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी येत नाहीत, अशी माहिती डुंबरे यांनी दिली. तसेच आयुक्तांना तातडीने दखल घेण्याची विनंती केली आहे.