मोहने येथील उद्यानाची झाली बकाल अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:30 PM2019-11-13T18:30:22+5:302019-11-13T18:31:30+5:30
उद्यान लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य भग्नावस्थेत घेतात अखेरचा श्वास
- उमेश जाधव
टिटवाळा: कल्याणडोंबिवली महानगरपालिकेत 'अ' प्रभागात असणाऱ्या मोहने येथील एकमेव उद्यान बकाल अवस्थेत पडून आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याकरिता बसवण्यात आलेली विविध खेळाचे प्रकार भग्नावस्थेत पडून असून त्यांचा केवळ सापळा उभा आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहाड ते टिटवाळा पर्यंत पालिकेचे मोहने येथे एकमेव उद्यान आहे. परंतू गेल्या सहा ते सात वर्षापासून पालिकेने उद्यानाच्या सुशोभीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध केला नाही, त्यामुळे त्याची अवस्था बकाल झाली आहे. लहान मुलांना खेळण्याकरिता पालिकेने विविध खेळण्याचे साहित्य उभारले होते.सुट्टयांमध्ये मोहने परिसरातील लहान मुले येथे खेळण्याकरिता आपल्या पालकांबरोबर येत होते. मात्र आजच्या घडीला खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांनी देखील खेळण्यास यायचे बंद करत या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.
परिसरात असणारे ज्येष्ठ नागरिक देखील याच उद्यानात सायंकाळच्या सुमारास विरंगुळा करण्यास येत असत. मात्र उद्यानात मोठ्याप्रमाणात पावसाळ्यात विविध प्रकारचे गवत उगवल्याने ज्येष्ठ नागरिकही येथे येण्याचे टाळू लागले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यान भग्नावस्थेत अखेरचा श्वास घेत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी भाजपचे आमदार नरेंद्र पवार हे प्रत्यक्षात उद्यानाची पाहणी करण्यास आले असता त्यांनी उद्यान सुशोभीकरण करिता निधी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासनही फोल ठरले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील या उद्यानाकडे दुर्लक्ष करत असल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांना खेळण्याकरिता बनवण्यात आलेल्या उद्यानाची मात्र बकाल अवस्था झाली आहे.
यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवक तथा 'अ' प्रभाग समिती सभापती दयाशंकर शेट्टी यांना उद्यानाच्या दैनावस्था बद्दल विचारणा केली असता उद्यानाचे सुशोभीकरण करता दहा लाखांचा निधी उपलब्ध केला असून, यामध्ये लहान मुलांकरता खेळण्याचे साहित्य तसेच पुरुष व महिलांकरिता ओपन जिम उभे करणार असल्याचे सांगितले.