माथेरानमधील मोकळ्या जागांवर बनणार उद्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:04 AM2019-05-29T00:04:37+5:302019-05-29T00:04:40+5:30
शहरातील बहुतांश प्रभागातील जागा रिक्त आहे. या जागांवर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेने अशा मोकळ्या जागेत उद्याने बनविण्यासाठी पुढाकार घेतला
माथेरान : शहरातील बहुतांश प्रभागातील जागा रिक्त आहे. या जागांवर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेने अशा मोकळ्या जागेत उद्याने बनविण्यासाठी पुढाकार घेतला असून अनेक प्रभागात अशा प्रकारच्या कामांना सध्या गती मिळत आहे. क्षणभर विश्रांतीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील काळात काही लोकप्रतिनिधींनी मतांच्या राजकारणापायी अनेक रिक्त जागांवर कचराकुंड्या बसविल्या होत्या. त्या कचराकुंड्या अल्पावधीतच तुटून त्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. बहुतांश भागात काही नागरिकांनी अतिक्रमणे केली होती. त्यामुळे नगरपरिषदेच्या जागेचा गैरवापर केला जात असल्याने त्या जागांवर सध्या उद्याने बनविण्यासाठी नगरपरिषदेने पावले उचलली आहेत. सर्वच प्रभागात अशा प्रकारे उद्याने बनविण्यात येणार असून माथेरानच्या सृष्टीसौंदर्यात भर पडणार आहे.
प्रभाग स्वच्छ, सुशोभित दिसणार आहे. पंचवटी नगर भागात प्रथमत: नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जुन्या स्टॅण्डपोस्टची जागा रिक्त झाल्यावर त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी छोटेसे उद्यान बनविले होते. त्याच धर्तीवर इंदिरा नगर भागात सुद्धा नागरिकांना आणि पर्यटकांना क्षणभर विश्रांतीसाठी उद्यान बनविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत गटनेते प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या सकारात्मक कामांबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.