जिल्ह्याला गारेगार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:45+5:302021-04-18T04:39:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू केली होती. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू केली होती. यामुळे कोरोनाच्या या संकटकाळी जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि अन्य गावपाड्यांना या पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. मात्र, या चैत्र, वैशाखाच्या कडकडीत उन्हाळ्यात ही पाणीकपात थांबवण्याचा निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने गारेगार दिलासा दिला आहे.
‘पाणीकपात रद्दच्या हालचालींना जोर’ या मथळ्याखाली लोकमतने २६ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून गृहिणींना दिलासा दिला होता. त्यानुसार प्रशासनाने निर्णय घेऊन महिन्यातील दोन वेळची २४ तासांची पाणीकपात रद्द केली आहे. पावसाळा अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर आला आहे. याशिवाय जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र, बारवी आदी प्रमुख धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. एवढेच नव्हे तर यंदा प्रारंभापासून दमदार पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत. त्यात कोरोनाचा काळ आणि कडक उन्हाळ्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. घशाला कोरड आणि घामाच्या धारांनी शरीरातील पाणी कमी होण्याचे सध्याचे अनुभव आहेत. परंतु, आता कपात थांबवल्याने नियमित व मुबलक पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या शहरांना त्यांचा मंजूर पाणीपुरवठा आता सुरळीत होईल. या शहरांना त्यांचा रोजचा तीन हजार ६२१ दश लक्ष लीटर (एमएलडी) हा मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे गृहिणींची पाणीसमस्या आता दूर होऊन त्यांना या कडकडीत उन्हाळ्यात पापड, कुरड्या, शेवया आणि वाळवणासाठी व धुणीभांडीकरिता मुबलक पाणी वापरता येणार आहे. यासाठी मात्र स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणेत थातूरमातूर समस्या उद्भवणार असल्याने दक्षता घेणे आवश्यक आहे.
--------