ठाण्यातील गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयात गॅस गळती; सुदैवाने जीवितहानी टळली
By जितेंद्र कालेकर | Published: October 15, 2023 03:29 PM2023-10-15T15:29:49+5:302023-10-15T15:30:02+5:30
गॅस ऑपरेटरच्या प्रसंगावधानाने वेळीच गळती नियंत्रणात, या ऑक्सिजन गळतीचा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणताही त्रास झालेला नाही.
ठाणे: वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या आवारातील ३९० किलो वजनी आॅक्सिजन गॅस सिलिंडरमधून मोठया प्रमाणात गळती झाल्याची घटना रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास समोर आली. गॅस गळतीमुळे रुग्णालयासह आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींच्या नावाने असलेल्या या किसननगरमधील विवियन होंडा शोरुमजवळील रुग्णालयात झालेल्या या ऑक्सिजन गळतीचा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणताही त्रास झालेला नाही. दाब वाढल्यामुळे सेफ्टी वॉल बेंड होऊन ऑक्सिजन गॅस गळती झाली. अवघ्या काही तासांमध्येच परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. वागळे इस्टेटमधील किसननगर नंबर ३, भटवाडी येथे शनिवारी सायंकाळी घरगुती गॅस सिलिंडर होऊन आग लागली होती. त्यामध्ये दोघे जखमी झाले असतानाच काही तासांमध्येच श्रीनगर येथे रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन गॅस सिलिंडर रूम मधील एसएसडी गॅसेस प्रा.लि. कंपनीचा ३९० किलो वजनी ऑक्सिजन गॅसचा प्रेशन वाढल्यामुळे सिलिंडरमधून रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. याची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णालयामधील ऑक्सिजन गॅस ऑपरेटर, सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.
रुग्णालयामधील ऑक्सिजन गॅस सिलिंडर
ऑपरेटर यांनी सिलिंडरचा प्रेशर नियंत्रणात आणून ऑक्सिजन गॅस गळती पूर्णपणे थांबवली. त्यातच ऑक्सिजन गॅस रूम मध्ये आणखी एक ३९० किलो वजनी ऑक्सिजन सिलेंडर असल्यामुळे त्या रुग्णालयामधील ऑक्सीजन गॅस पुरवठा मात्र सुरळीत सुरु होता. दरम्यान या रुग्णालयामधील रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.तसेच सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयातील प्रशासक आणि सुरक्षा रक्षक यांना त्या एसएसडी गॅसेस प्रा. लि. या कंपनीचे असलेले ऑक्सिजन गॅस सिलिंडरची कंपनीकडून देखभाल करून घेण्यास सांगण्यात आल्याची माहितीही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.