उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गॅस गळती, एकाचा मृत्यू तर अकरा जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 07:11 AM2018-02-16T07:11:07+5:302018-02-16T07:14:17+5:30
शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
उल्हासनगर : शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-1 शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीत हजारो कामगार काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील काम ठेकेदाराला दिले होते. ठेकेदाराने खाजगी कामगारांमार्फत काम करणे सुरू केले असता काम लवकर करण्याचा तगादा कंपनी व्यवस्थापनाने ठेकेदाराच्या मागे लावल्याचे समजते. दरम्यान, ठेकेदाराने रात्री सव्वा - साडे बारा वाजता कामाला सुरुवात केली असता कंपनीतील पत्रा तुटून विषारी गॅसची गळती सुरू झाली. त्यावेळी कंपनीत एकच धावपळ उडाली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने गॅस गळतीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, या गॅस गळतीच्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर अकरा जण गंभीर असून त्यांना कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, सेंच्युरी रेयॉन कंपनीतील गॅस गळतीच्या घटनेमुळे शहाड गावठाण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.