कसारा घाटात गॅसटँकर उलटला, चालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:31 AM2019-03-05T04:31:29+5:302019-03-05T04:31:37+5:30
उरणहून नाशिक, सिन्नरकडे जाणारा एचपी गॅसचा टँकर सोमवारी सकाळी कसारा घाटात टोपाची बावडीच्या वळणावर उलटला.
कसारा : उरणहून नाशिक, सिन्नरकडे जाणारा एचपी गॅसचा टँकर सोमवारी सकाळी कसारा घाटात टोपाची बावडीच्या वळणावर उलटला. यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती.
कसारा घाट चढत असताना टोपबावडीच्या वळणावर गॅसटँकरला ओव्हरटेक करताना एका कंटेनरने कट मारला. त्यावेळी टँकरचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टँकर उलटला. यात चालक जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये, पीएसआय डगळे आणि कर्मचारी, घोटी टॅप महामार्ग पोलीस, पिंक इन्फ्रा या महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही प्रमाणात गॅसगळती होत असल्याने दक्षता म्हणून कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवरून (नाशिक-मुंबई मार्गिका-नवीन कसारा घाट) वळवण्यात आली. दरम्यान, अपघात झाल्यापासून दोन तासांनी एचपी गॅस बोटलिंग प्लान्टचे प्रोजेक्ट मॅनेजर अखिल पचौरी आणि त्यांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर काही प्रमाणात गॅसगळती बंद करण्यात आली. मात्र, टँकर पूर्णपणे उलटल्याने गॅसगळती होण्याची भिती
होती.
अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट देत महसूल कर्मचाऱ्यांना मदतीसाठी तैनात केले. दरम्यान, सुटीचा दिवस असल्याने महामार्गावर गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती, त्यामुळे एकाच मार्गिकेवर दोन्ही लेनच्या गाड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होती. दरम्यान, टँकर हटविण्यासाठी भिवंडी येथून महाकाय क्रेन मागवण्यात आल्या होत्या.