‘नीरी’कडून वायूची तपासणी : विहिरीत आढळली मिथेनची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 04:25 AM2018-11-06T04:25:59+5:302018-11-06T04:27:49+5:30
पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता.
कल्याण - पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यानुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) सोमवारी पाचारण केले होते. या संस्थेने दुपारी ३ वाजल्यापासून तेथे सयंत्राद्वारे विहिरीतील विषारी वायूची तपासणी सुरू केली. त्याचा अहवाल लवकरच मिळणार आहे. मात्र, विहिरीत मिथेन वायूची मात्रा आढळली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी विहिरीवर ‘नीरी’च्या अधिकाऱ्यांना सयंत्र लावण्यास सांगितले. सयंत्राद्वारे विहिरीतील प्राणवायू, गंधक आणि मिथेन वायूची मात्रा त्यातून स्पष्ट होणार आहे. यंत्र लावताच तेथे मिथेन वायूची मात्रा ८०० पार्ट्स पर मिलियन इतकी आढळून आली. जागतिक निकषांनुसार माणसाचा मृत्यू ५०० ते एक हजार पार्ट्स पर मिलियन इतक्या मिथेन वायूमुळेही होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती आहे.
विहीर स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात प्रथम जो एक जण उतरला, तो बाहेर न आल्याने अन्य दोन जण गेले. त्यानंतर, दोन फायरमन गेले. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्याने विहिरीच्या तळाशी असलेला गाळ ढवळून निघाला. घटना घडली, त्यावेळी मिथेन वायूचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. घटनेच्या दुसºया दिवशी विहिरीतील गाळ उपसण्यात आला. त्यामुळे विहिरीच्या तळाशी गाळासह २० टक्के पाणी दिसत होते. तर, गाळ काढल्यावर विहीर दुसºया दिवशी ८० टक्के भरली. आज विहिरीतील पाणी कठड्यावरून बादलीने भरून घेता येईल, इतके वरती आले आहे.
कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी व घरगुती सांडपाणी मिसळून विहीर प्रदूषित झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहिरीच्या परिसरातील कारखान्यातून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडले जात नसल्याचा प्राथमिक पाहणी अहवाल दिला होता. तर, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारखाने बंद करण्याची नोटीस कारखान्यांना दिली.
कायदेशीर बाबी तपासणार
केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी दोन दिवसांपूर्वी विहिरीची पाहणी करून ती बुजवण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, विहीर खाजगी मालकीची आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून ती बुजवण्यात येईल, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी आज दिले.
विहिरीचे मालक हे मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी गुजरातला गेल्याने ते परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करून व कायदेशीर बाबी तपासून विहीर बुजवली जाणार आहे.
स्फोटक परिस्थितीची भीती
विहिरीच्या तळाशी विषारी वायू आहेत. ते काढले गेले पाहिजे. अन्यथा, ते विषारी वायू आसपासच्या सांडपाण्याच्या नलिकेतून अन्य ठिकाणी मार्गस्थ होऊन तेथे स्फोटक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांनी सांगितले.