भिवंडीत दुषीत पाण्याने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोचा आजार , बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:13 PM2018-04-13T17:13:04+5:302018-04-13T17:13:04+5:30
भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.
तालुक्यातील ग्रामिण भागात मोठ्या संख्येने वीटभट्ट्या असून त्या ठिकाणी जिल्ह्यातील आदिवासी भागातून वीटभट्टी मजूर वीटा बनविण्यासाठी आलेला असतो. जिल्ह्यातील आदिवासी मजूर पावसाळ्यात शेतात तर पावसाळा संपल्यानंतर वीटा बनविण्यासाठी वीटभट्टीवर येत असतो. मात्र वीटभट्टी मालकाचे दुर्लक्ष असल्याने त्यांची रहाण्याची व पिण्याच्या पाण्याची आबाळ असते. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामिण भागात नेहमी पाण्याची कमतरता असते. तर वीटभट्ट्या गावापासून लांब असल्याने गावालगत अथवा वीटभट्टीजवळ असणारे डवरे,झरे,नदी,तलाव व विहिरी या स्त्रोतामधून मिळणाऱ्या पाण्यावर या मजूरांना अवलंबून रहावे लागते. अन्यथा वीटभट्टीसाठी आलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या स्त्रोतांमधून मिळणारे पाणी शुध्द अथवा अशुध्द असल्याचे मजूरांना महिती नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्या भागातील वीटभट्टी मजूरांची आरोग्य तपासणी होत नाही.शासन महिला व बालकांसाठी राबवित असलेले आरोग्यदायी उपक्रम मजूरांपर्यंत व त्यांचा मुलांपर्यंत न पोहोचल्याने मजूरांच्या कुटूंबाच्या जीवावर बेतते.असा प्रकार काल रोजी जूनांदुर्खी येथे घडला आहे. या भागातील वीटभट्टी मजूरांनी व त्यांच्या कुटूंबांनी दुषित पाणी प्यायल्याने त्यांना गेस्ट्रोची लागण झाली. मजूरांना व त्यांच्या मुलांना अचानक जुलाब, उलट्या सुरू झाल्या.गेस्ट्रोची लागण झालेल्या नयन निलेश मानकर या दोन वर्षाच्या मुलाचा काल गुरूवार रोजी मृत्यु झाल्यानंतर वीटभट्टी मालकाने या घटनेची माहिती चिंबीपाडा आरोग्य केंद्रात दिली.त्यानंतर आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले.आरोग्य पथकाने गुलाब गणपत वाजे (५५), दुदाराम चंदन पवार (४५), अमोल गुरु नाथ दिवे (१०), सुनिता मधुकर दिवे (५०), पारस गुरु नाथ दिवे (६), रोशनी अजय गावित (४), प्रगती दीपक गवळी (५) या सातजणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले .
जूनांदूर्खी येथे गॅस्ट्रोमुळे झालेल्या दोन वर्षाच्या मुलाला वेळीच आरोग्य केंद्राकडून उपचार न मिळाल्याने त्याच्या मृत्युच्या चौकशीची मागणी परिसरांतील नागरिकांनी केली असून वीटभट्टीवर मोलमजूरीसाठी आलेल्या मजूरांसह गावातील लोकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा तसेच शुध्द पाण्यासाठी उपाययोजना पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात याव्यात.तसेच वीटभट्टी मजूरांची प्रत्येक आठवड्यात आरोग्य तपासणी करावी,अशी मागणी ग्रामिण समाजसेवी संस्था व ग्रामस्थांकडून केली जात आहे.