...अन् तळीरामांचा गटारीचा प्लान फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:19 PM2019-07-31T17:19:40+5:302019-07-31T17:23:59+5:30
गटारी साजरी करण्याच्या योजनांवर पाणी
ठाणे: दारू पिण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला आहे. वनात जाणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला असून वनात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येऊरमध्ये असलेल्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये ४२ कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला होता.
बुधवारी गटारी (दर्श) अमावस्या असल्याने तळीराम आणि मांसाहार करणाऱ्यांची सर्वत्र पार्ट्या होत असताना येऊर (ठाणे) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र असे दृश्य दिसून आले नाही. पावसाचा मोसम आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल असल्याने या ठिकाणी पार्ट्या करण्याची योजना अनेक तरुण आणि तळीरामांनी आखल्या होत्या. मात्र वन वन विभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्यांना पार्ट्यांचा बेत पूर्ण करता आला नाही.
ठाणे पोलिसांनी येऊरच्या मानवी वसाहतींमध्ये नाक्यांनाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. तर वन विभागात जाणाऱ्या पॉइंटवर वन विभागाने ६ तुकड्या बनवून ४२ कर्मचारी-अधिकाऱ्यांमार्फत बंदोबस्त ठेवला होता. एकालाही वनात जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान वनात जाण्यास मनाई असतानाही अनेक उत्साही तरुण-तरुणी आतमध्ये लांबवर जातात. आतमध्ये वन्य प्राणी असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेष खबरदारी घेतल्याचे वन विभाग अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.