तिथेही गप्पांची मैफिल जमवायला...देवांना हसवायला! एक हसरा चेहरा हरवला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 11:35 PM2021-03-27T23:35:01+5:302021-03-27T23:35:49+5:30
अशोक शेवडे यांच्यावर एक लेख लिहा, असा मला फोन आला आणि आठवणींचे मोहोळ उठले. मोहोळामधल्या मधमाश्या सभोवताली फिरू लागल्या, पण मला मुळीच न डसता... उलट, आनंदाच्या विविधरंगी फुलांवर विराजमान झाल्या, आणि मधुर मधासारख्या अनेक आनंददायी आठवणी मनामध्ये पाझरू लागल्या...
प्राची देवस्थळी
‘तुमच्या सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे रहस्य काय?’ ‘चंदेरीसोनेरी कार्यक्रमातील हा माझा त्यांना पहिलाच प्रश्न... त्यावर केवळ उत्तरच नाही तर अनेक गमतीदार किस्से, विनोदी चुटकुले, सुविचार, स्वानुभव यांची बरसात सुरू व्हायची. हंशा टाळ्यांचा पाऊस पडायचा! अशोक शेवडे नावाची ‘मैफिल’च रंगायची म्हणा ना! अशोकजी... खरे तर एक असे व्यक्तिमत्त्व जे कधीच कोणाच्याही हाताला लागले नाही! किंबहुना त्यांचे लाडके कवी ‘सुरेश भट’ यांच्या काव्यात सांगायचे झाले तर- ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!’
तसे पाहायला गेले तर मनमोकळ्या गप्पा मारणारे अशोकजी साऱ्यांनाच हवेहवेसे वाटणारे. मग ते दूरच्या प्रवासाला निघालेले त्यांचे परममित्र रसिकराज सुशीलकुमार शिंदे असोत किंवा मराठी चित्रपट दुनियेवर राज्य करणारे रमेश देव असोत. यांच्या प्रवासात अखंड ‘शब्दौघ’ घेऊन अशोकजी स्वत:ही एंजॉय करायचे आणि सहप्रवाशालाही आनंदी करायचे. हसत ठेवायचे!!
नावात काय आहे? असे म्हणून पुढच्या प्रश्नाकडे जाताना मी नेहमी म्हणायचे, ‘मंडळी, अहो, नावातच खूप काही आहे! आता पाहा यांचे नाव ‘अशोक’ अर्थात जिथे शोक (दु:ख) नाही ते ‘अ-शोक’. ‘यावर तितक्याच तत्परतेने ते म्हणायचे, ‘जगामधल्या दु:खापेक्षा माझे लक्ष नेहमीच सुखाकडे, आनंदाकडे असते. तुम्हीही तेच करा. आनंदाचा विचार करा म्हणजे तुम्हीही अ-शोक व्हाल. आनंदी राहाल.’ गेल्या पस्तीस वर्षांत मी आणि त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक जण त्यांच्याकडून खूप काही शिकत आलाय. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे ते स्वत: प्रत्येक गोष्ट अनुभवणार आणि करणार आणि मगच सांगणार. विविध माध्यम लीलया हाताळताना ‘अभ्यासूनि प्रकटावे’ हे तंतोतंत पाळून ५००० मुलाखतींचा विक्रम करणारे अशोकजी हे एक अजबच रसायन होते! मार्गदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला इतके काही सांगायचे की, येणारा परत जाताना ‘तृप्त’ होऊन जायचा. त्यांचा मित्रपरिवार प्रचंड होता. त्यांना ‘रिकामपण’ असे कधीच आले नाही. अत्यंत हरहुन्नरी! रोज नवनवीन कल्पना सांगणे, ‘चंदेरी सोनेरी’च्या ४००व्या प्रयोगाची जणू काही उद्याच कार्यक्रम आहे, अशा रीतीने तयारी करणे, सतत काहीतरी लिहिणे, अनेक कात्रणे, विनोदी गोष्टी जमवणे, जमविलेले सारे व्यवस्थित वहीत चिकटवून ठेवणे. सारे काही प्रचंड वेगाने ते करायचे. विचारांचा वेग तर वादळालाही लाजवेल असा असायचा! एखादी गोष्ट, एखादा किस्सा सांगायला घेतला की त्यात खूप सारे तपशील सांगायचे. कारण अनुभवाचे भलेमोठे भांडार त्यांच्याकडे होते. त्या भांडारामध्ये हिरे, माणके, मोती, सोने-नाणे इतके होते की कधीच न संपणारे. अगदी द्रौपदीच्या थाळीसारखे!
मार्च महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस अशाच गप्पाटप्पा अर्थात भ्रमणध्वनीवर चालू होत्या आणि अचानक ‘मी हॉस्पिटलमध्ये आहे.’ हे त्यांचे वाक्य ऐकले आणि मी सुन्न झाले. त्यानंतर संपर्क तुटला! त्यांचा सुपुत्र अमित याला शेवटी फोन केला आणि सारे काही कळले. पाहता पाहता त्यांची तब्येत खालावत गेली आणि अखेर तो हृदयद्रावक क्षण आला. लोकप्रिय मुलाखतकार, निवेदक, लेखक-दिग्दर्शक, दूरदर्शन आकाशवाणी कलावंत, प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा हा कोणाचा मित्र, कोणाचा गुरू, कोणाचा मार्गदर्शक मुख्य म्हणजे एक अफलातून रसिक सर्वांना दु:खात लोटून स्वत: डोळे मिटून शांतपणे हे जग सोडून गेला. थेट स्वर्गात... तिथेही गप्पांची मैफिल जमवायला... देवांना हसवायला! परमेश्वराला त्याचेच पृथ्वीवरचे किस्से सांगून मनसोक्त हसवायला. परमेश्वराला तरी कोण हसवणार?